WTC Final : टीम इंडिया अजूनही जिंकू शकते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे जेतेपद, जाणून घ्या समीकरण | पुढारी

WTC Final : टीम इंडिया अजूनही जिंकू शकते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे जेतेपद, जाणून घ्या समीकरण

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडिया आयसीसीच्या आणखी एका विजेतेपदापासून वंचित असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्याचे दोन दिवस संपलेले आहेत. अशातच भारतीय संघ इतका पिछाडीवर आहे की आधी बरोबरी करणे आणि नंतर आघाडी घेणे सोपे काम नाही. तब्बल दहा वर्षांनंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ संपवेल अशी अपेक्षा होती, मात्र आता तसे होताना दिसत नाही. तथापि, सामन्याचे अजून तीन दिवस शिल्लक असून भारतीय चाहते अजूनही आशावादी आहेत. टीम इंडियाचे जेतेपदाचे स्वप्न अजूनही पूर्ण होऊ शकते, परंतु हा मार्ग खूप कठीण आहे. एक लहानशी चूकही खेळ खराब करू शकते.

टीम इंडियासाठी विजेतेपदाचा मार्ग अद्याप बंद झालेला नाही

भारतीय संघ WTC विजेतेपद कसे मिळवू शकतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. अंतिम सामन्याचे आतापर्यंत दोन दिवस खेळले गेले असून भारतीय संघ पिछाडीवर आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 5 विकेट गमावून 151 धावा केल्या होत्या. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या. म्हणजेच आता फॉलोऑन टाळण्यासाठी टीम इंडियाला 270 धावांपर्यंत मजल मारावी लागणार आहे. सध्या अजिंक्य रहाणे आणि केएस भरत क्रीजवर आहेत आणि त्यानंतर शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज मैदानात उतरतील. या सर्वांना अजून 120 धावा करायच्या आहेत. हे लक्ष्य गाठले तर ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात पुन्हा फलंदाजी करावी लागेल.

यानंतर ऑस्ट्रेलियाकडे जवळपास 200 धावांची आघाडी असेल. तिसरा पूर्ण दिवस खेळून भारतीय संघ बाद झाला, तर आणखी दोन दिवसांचा खेळ शिल्लक राहील. यानंतर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या डावात फलंदाजी करेल तेव्हा त्यांना किमान 200 ते 250 धावा कराव्या लागतील, जेणेकरून भारतासमोर मोठे लक्ष्य ठेवता येईल. म्हणजेच चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला संपूर्ण दिवस फलंदाजी करावी लागू शकते. अशाप्रकारे चार दिवसांचा खेळ पूर्ण होईल. यानंतर शेवटचा दिवस राहील. सामन्याचा शेवटचा दिवस खेळूनही टीम इंडियाची तारांबळ उडाली तर सामना अनिर्णितकडे जाईल.

सामना अनिर्णित राहिल्यास भारत आणि ऑस्ट्रेलिया संयुक्त विजेता होऊ शकतात

आयसीसीने आधीच जाहीर केले आहे की जर सामना अनिर्णित राहिला तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेचे परीक्षण केले जाणार नाही, दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल. म्हणजे भारतीय संघ हरणार नाही आणि संयुक्तपणे तरी किमान आयसीसी जेतेपदाचे स्वप्न अधुरे राहणार नाही.

मात्र, बातमीत चर्चा केलेले समीकरणे खूप कठीण असले तरी, अशा परिस्थितीत पहिल्या डावातील उर्वरित पाच फलंदाजांनाच नव्हे तर भारतीय गोलंदाजांनाही दुसऱ्या डावात पूर्वीपेक्षा चांगली कामगिरी करावी लागेल, तरच ते शक्य होईल. वर सांगितलेल्या गोष्टी घडल्या नाहीत तर जेतेपदाचे स्वप्न अधुरे राहण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे, फायनलमध्ये टीम इंडियासमोर फॉलोऑनचे संकट उभे राहिले, तर मात्र परिथिती अजूनच बिकट होईल.

ओव्हलवर चौथ्या आणि पाचव्या दिवशीही पावसाची शक्यता

दरम्यान, सामन्याच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशीही पावसाची शक्यता आहे. मात्र, हे टाळण्यासाठी आयसीसीने राखीव दिवसाची व्यवस्था केली आहे, म्हणजेच 12 जूनलाही सामना होऊ शकतो, त्यामुळे पावसाने मदत होईल, असा विचार करत असाल तर तुमची चूक आहे. होय, सहाव्या दिवशीही पाऊस पडला आणि दोन्ही संघांचे दोन-दोन डाव पूर्ण झाले नाहीत तरच सामना अनिर्णित राहील हे निश्चित, पण सहाव्या दिवशी पावसाची शक्यता नगण्य आहे. त्यामुळे टीम इंडियाने पावसावर अवलंबून न राहता इथून आपली कामगिरी सुधारण्याची गरज आहे, तरच पराभव टाळता येईल.

Back to top button