

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने गुंठेवारी मोहिम राबविण्यासाठी पुन्हा सहा महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे डिसेंबर २०२० पर्यंतच्या हजारो अनधिकृत मालमत्ताधारकांना संधीचा फायदा घेत नियमितीकरण करून घेता येणार आहे. दरम्यान, मागील दोन वर्षात राबविण्यात आलेल्या गुंठेवारी मोहिमेतील प्राप्त १० हजार ७६० अर्जांपैकी ९ हजार ८४२ मालमत्ताधारकांच्या गुंठेवारी नियमितीकरणाच्या संचिकांना मंजूर करण्यात आल्याची माहिती नगररचना विभागाचे उपसंचालक मनोज गर्जे यांनी दिली.
राज्य शासनाने गुंठेवारी नियमितीकरणाला डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महापालिकेने गुंठेवारी भागातील मालमत्ता नियमितीकरणाला सुरूवात केली. ९ जुलै २०२१ गुंठेवारी भागातील मालमत्ता नियमितीकरणासाठी नगररचना विभागाने ५१ वास्तू विशारदांचे पॅनल तयार करून त्यांच्यामार्फत संचिका स्वीकारण्यात आल्या. तसेच दीड हजार चौरस फुटाच्या आतील बांधकामांना नियमित करण्यासाठी रेडीरेकनर दराच्या ५० टक्के दर आकारण्यात आला. त्यामुळे शहरातील गुंठेवारी भागातील मालमत्ताधारकांकडून नियमितीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रेडीरेकनर दराची ही सूट टप्प्या-टप्प्याने कमी करण्यात आली. मे २०२२ पासून १०० टक्के रेडीरेकनर दर आकारण्यास सुरूवात झाली. त्यामुळे गुंठेवारी नियमितीकरणाला मिळणारा प्रतिसाद कमी झाला. परंतु, असे असतानाही मनपाकडून गुंठेवारी नियमितीकरणाला सहा महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत संचिका दाखल करता येणार असल्याचे मनोज गर्जे यांनी सांगितले.
हेही वाचा