सांगली : पुढारी वृत्तसेवा
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाचे जोरदार आंदोलन झाल्यानंतर भाजप सरकारच्या काळात समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहासह विविध सुविधा देण्याच्या घोषणा झाल्या. तात्पुरते भाड्याच्या जागेत वसतिगृहही सुरू झाले. मात्र तिथे सुरू असलेले वसतिगृहही बंद पडले आहे. त्यामुळे वसतिगृहाची घोषणा हवेतच ठरल्याचे दिसत आहे.
तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथील गंजीखान्याच्या जागेवर वसतिगृह उभारण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे सुमारे 1 हेक्टर 41 आर जागा वसतिगृहासाठी देण्याची घोषणा केली. त्यानंतर चार वर्षांपूर्वी या जागेवर कायमस्वरुपी वसतिगृह सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करून पाठवण्यात आला. ही फाईल मंत्रालयात अद्याप पडून आहे. दरम्यान, मध्यंतरीच्या काळात या जागेवर श्री गणपती पंचायतन संस्थानचा फलक लागला. त्याची दखल घेऊन अप्पर तहसीलदार डॉ. पाटील यांनी या जागेवरील फलक तात्काळ हटवला.
गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी समाजातील कार्यकर्ते पुन्हा आक्रमक होऊ लागले आहेत. त्यामुळे या नियोजित जागेवर वसतिगृह उभारले जाईल, याबाबत मराठा समाजातील कार्यकर्त्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र त्यासाठी स्थानिक नेते, शासकीय अधिकारी आणि मराठा समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी पाठपुरावा सुरू करणे गरजेचे आहे.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना तात्काळ वसतिगृह मिळावे, यासाठी भाड्याच्या जागेत ते सुरू केले होते. कोरोना संसर्गामुळे ते बंद झाले. आता शासकीय जागेत सरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गंजीखान्याची जागा आणि निधी उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
– आमदार सुधीर गाडगीळ