सोलापूर : मर्यादित जागा, अमाप खर्चामुळे परदेशी शिक्षण | पुढारी

सोलापूर : मर्यादित जागा, अमाप खर्चामुळे परदेशी शिक्षण

सोलापूर : महेश पांढरे
युक्रेन आणि रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला गेलेल्या विद्यार्थ्यांचा विषय चांगलाच चव्हाट्यावर आला असून, त्यांना परत मायदेशी आणण्यासाठी शासन स्तरावरुन मोठे प्रयत्न सुरु आहेत. मात्र वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेन आणि युरोप, अमेरिकेलाच का प्राधान्य देतात या विषय आता चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे यामागचे नेमके कारण काय आहे, याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे. यामागे भारतात असलेल्या मर्यादित जागा आणि प्रचंड खर्च यामुळे भारतातील अनेक विद्यार्थी परदेशातील वैद्यकीय शिक्षणाला अधिक महत्त्व देत असल्याची बाब पुढे आली आहे.

भारतात दरवर्षी वैद्यकीय शिक्षणाच्या खासगी आणि शासकीय महाविद्यालयात मिळून जवळपास 90 हजार जागा आहेत. या वैद्यकीय शिक्षणासाठी घेण्यात येणार्‍या नीट परीक्षेसाठी दरवर्षी भारतातून जवळपास 12 लाख विद्यार्थी बसतात. त्यामुळे वैद्यकीय प्रवेशासाठी मोठी रस्सीखेच लागते. भारत देशात वैद्यकीय शिक्षणासाठीच्या मर्यादित जागा आणि त्यामध्ये पुन्हा विविध प्रवर्गांसाठी असणारे आरक्षण यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातील हजारो विद्यार्थ्यांना इच्छा असूनही शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशाचे मेरिट वाढते. अनेकांना इच्छा असूनही प्रवेश मिळत नाही. त्यामुळे असे विद्यार्थी मग युरोप, अमेरिका आणि युक्रेन या देशात शिक्षणाला प्राधान्य देतात.

भारतात वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी दरवर्षी 50 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतचा खर्च येतो. त्यामुळे चार वर्षांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी जवळपास चार ते पाच कोटी रुपयांचा खर्च करावा लागतो. त्यामुळे अनेकांची इच्छा असली तरी एवढा खर्च करण्याची आर्थिक परिस्थिती नसते. त्यामुळे काही विद्यार्थी युरोप आणि अमेरिकेचा मार्ग अवलंबतात.त्याठिकाणी खर्च दरवर्षी 70 ते 80 लाख रुपयांपर्यंत असतो. त्यामुळे बर्‍यापैकी विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला जातात. त्याठिकाणी वर्षाकाठी किमान 20 ते 25 लाख रुपयांपर्यंतचा खर्च येतो.

परदेशी शिक्षण झाल्यामुळे भारतात व्यवसाय करताना अनेक रुग्ण अशा परदेशातून शिक्षण घेऊन आलेल्या डॉक्टरांना अधिक प्राधान्य देतात. त्यामुळे या डॉक्टरांचा वैद्यकीय व्यवसायही वाढतो. देशात सध्या सुरू असलेल्या अनेक नामवंत हॉस्पिटलमध्ये अशा परदेशातून शिक्षण घेऊन आलेल्या नव्या डॉक्टरांना अधिक प्राधान्य दिले जाते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे आकर्षण असते.त्यामुळे दरवर्षी भारतातून युरोप, अमेरिका, रशिया, युक्रेन या देशात हजारो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी जात असतात. सध्या भारतातील 700 ते 800 विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये अडकले असून, त्यांना परत मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारकडून सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू झाले आहेत.

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची परवानगी लागते

वैद्यकीय शिक्षणासाठी दरवर्षी हजारो विद्यार्थी भारतातून अमेरिका, रशिया, युरोप, युक्रेन,जर्मनी या देशात जात असतात. अनेकवेळा परदेशातून शिक्षण घेऊन आलेल्या नव्या डॉक्टरांना भारतातील अनेक नामवंत रुग्णालयांमध्ये मोठी संधी असते. खासगी व्यवसाय करण्यासाठीही या डॉक्टरांना रुग्णांची पसंती असते. त्यामुळे त्यांचा डॉक्टरी व्यवसाय चांगल्या पध्दतीने चालतो. मात्र शिक्षण पूर्ण केल्यानंतर या डॉक्टरांना राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अपेक्षित असते. तरच त्यांना भारतात व्यवसाय करता येतो.

परदेशी शिक्षणाचा पॅटर्न आपल्या देशात राबविण्यासाठी तसेच वैद्यकीय शिक्षणासाठी होणारा कोट्यवधीचा खर्च कमी करण्याची गरज आहे. त्यासाठी तज्ज्ञांची मते मागवणार
– ना. अमित देशमुख
वैद्यकीय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र

भारतात वैद्यकीय प्रवेशाच्या जागा कमी आणि खर्च अधिक आहे. त्यामुळे देशातील अनेक विद्यार्थी परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेत असतात.
– डॉ. संजीव ठाकूर
अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय

Back to top button