सांगली : पुढारी वृत्तसेवा
गेल्या आठवड्यात पडलेल्या मोठ्या पावसामुळे जिल्ह्यात हुमणीचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. पुढील काळात हा किडीचा सोयाबीन, भुईमूग, उसासह अन्य पिकांना मोठ्या फटका बसण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात नुकताच अनेक ठिकाणी मोठा पाऊस झाला आहे. वळीवाचा पाऊस पडल्यानंतर हुमणीचे भुंगे सायंकाळी जमिनीतून बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. लिंब, बाभूळ यासह अन्य झाडावरून हे भुंगे मोठ्या प्रमाणात येत आहेत. प्रामुख्याने सायंकाळी जमा होणारे भुंगे प्रकाश सापळे किंवा गंध सापळे लावून गोळा करणे किंवा या झाडावर कीटकनाशकाची फवारणी करून भुंगे मारणे हा कमी खर्चाचा उपाय आहे. त्यासाठी अशा झाडांवर फवारणीसाठी क्लोरोपायरिफॉस 50 टक्के 4 मिली प्रती लिटर पाणी याप्रमाणात वापरावे. उस लागण केल्यानंतर हुमणीचा प्रादुर्भाव होवू नये, म्हणून लागण करतेवेळी बेसल डोसबरोबर दाणेदार कीटकनाशक एकरी 10 किलो वापरावे. उसामध्ये सोयाबीन किंवा भुईमूग आंतरपिक असल्यास हुमणीचा प्रादुर्भाव प्रथम या पिकांना होतो.
यावेळी क्लारोपायरिफॉस 50 टक्के 400 मिली प्रती 100 लिटर पाणी या प्रमाणात आंतरपिकाची आळवणी करावी.
ज्या शेतकर्यांचा ऊस मोठा आहे, त्यांनी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात व्हीएसआय ईपीएन कल्चरचे एकरी 1 लिटर 200 लिटर पाण्यातून ठिबक अथवा पाटपाण्यातून आळवणी करावी. प्रादूर्भाव झाल्यानंतर होणार्या नुकसानीपेक्षा हुमणी होवू नये, यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. -विलास जाधव, (ऊस विकास अधिकारी, क्रांती साखर कारखाना, कुंडल)