शिरटी, पुढारी वृत्तसेवा : भारतीय सैन्यदलात सेवा बजावणारे कुटवाड ( ता. शिरोळ ) येथील जवान राजेंद्र धोंडीराम पाटील ( वय ४३ ) यांचे दिल्ली येथे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
ते मेरठ येथे सिग्नल रेजिमेंटमध्ये येथे नायब सुभेदार या पदावर कार्यरत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते दिल्ली येथे कर्तव्य बजावत होते.
त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने २ ऑगस्ट रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते.
मात्र उपचार सुरू असताना सोमवारी १६ ऑगस्ट रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पाश्चात्य आई, वडील, पत्नी, मुलगा, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे.
त्यांच्या या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
त्यांचे पार्थिव आज रात्री उशिरा ॲबुलन्सने मिरज येथे दाखल होणार आहे.
गुरुवारी सकाळी ९ वाजता शासकीय इतमात त्यांच्या पार्थिवावर कुटवाड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
मात्र आज रात्रीच पार्थिवावर अंत्यसंस्कार करावेत, अशी अपेक्षा कुटूंबियांनी व्यक्त केली आहे.
येथील ग्रामस्थांमार्फत अंत्यविधीची तयारी सुरू असून महापुरामुळे स्मशानभूमीत साचलेला गाळ तसेच स्वछता सुरू आहे.