पणजी : दाबोळी विमानतळावरून बंडखोर एकनाथ शिंदे समर्थकांना याच बसमधून मोठ्या पोलिस बंदोबस्तात ताज कन्व्हेंन्शन सेंटर या पंचतारांकित हॉटेलमध्ये नेण्यात आले. 
Latest

एकनाथ शिंदे गट गोव्यातून आज मुंबईत येणार; गुवाहाटीतून ‘जय महाराष्ट्र’ म्हणत गाठले गोवा

Shambhuraj Pachindre

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; गेले आठ दिवस आसामची राजधानी गुवाहाटीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारविरोधात रणनीती ठरविणार्‍या बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटाने बुधवारी आपला मुक्‍काम गोव्यात हलविला. शिंदे गटाचे 39 आणि काही अपक्ष आमदार विशेष विमानाने गोव्यात पोहोचले असून, ते गुरुवारी सकाळी मुंबईत येणार आहेत.

हे बंडखोर आमदार गुरुवारी सकाळी गोव्यातून मुंबईत दाखल होतील. त्यांच्या सुरक्षेसाठी राज्याची पोलिस यंत्रणा आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणांचे जवानही तैनात करण्यात आले आहेत. 20 जून रोजी विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया सुरू असताना एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेना नेतृत्वाला गुंगारा देत थेट सुरत गाठले. सुरतमध्ये शिवसेनेकडून शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला; परंतु एकनाथ शिंदे हे आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याच्या निर्णयावर ठाम राहिले. आपल्या गटाला कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून शिंदे यांनी सुरतमधून भाजपशासित आसामच्या गुवाहाटीत आपला मुक्‍काम हलविला.

गुवाहाटीत पोहोचल्यानंतर शिंदे गटाने हळूहळू आपले पत्ते खुले केले. त्याचवेळी शिवसेनेचे आमदार गटागटाने, तर कधी एकेकट्याने शिंदे यांच्या गोटात दाखल होत होते. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदावरून हकालपट्टी करून त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिंदे गटाने या निर्णयाला गुवाहाटीतून शह दिला. शिंदे यांनी आपल्या आमदारांची बैठक घेऊन गटनेतेपदी स्वतःची नेमणूक करताना मुख्य प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नेमणूक केली. त्यानंतर शिंदे यांनी गटाचे प्रवक्‍ते म्हणून आमदार दीपक केसरकर यांना पुढे आणले. केसरकर यांच्यासह अनेक आमदारांच्या माध्यमातून शिंदे हिंदुत्वाची आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची भूमिका मांडत राहिले.

विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिल्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेने बंडखोर 16 आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईसाठी याचिका दाखल केल्यानंतर शिंदे गटाने गुवाहाटीतून या याचिकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने नोटीस बजावलेल्या 16 आमदारांना आपले म्हणणे मांडण्यासाठी 11 जुलैपर्यंत मुदत दिल्यानंतर शिंदे आणि भाजप गोटात हालचालींना वेग आला. मधल्या काळात एकनाथ शिंदे यांनी बडोद्यात जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची चर्चा होती. भाजपने मंगळवारी राज्यपालांची भेट घेऊन राज्य सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली. ही मागणी मान्य करत राज्यपालांनी आज, 30 जून रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून बहुमत सिद्ध करण्याची सूचना ठाकरे सरकारला केली. मात्र ठाकरे यांनी राजीनामा दिला.

कामाख्या देवीचे दर्शन
दरम्यान, गुवाहाटी सोडण्यापूर्वी शिंदे यांनी आपल्या आमदारांना घेऊन कामाख्या देवीचे दर्शन घेतले. गुवाहाटीतून निघताना 'जय महाराष्ट्र' म्हणत गेल्या काही दिवसांत केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले आहेत.

  • केंद्रीय आणि राज्य सुरक्षा यंत्रणा तैनात
  • कामाख्या देवीचे दर्शन घेऊन केले प्रयाण

मीडियाला चकवा देत विमानतळाच्या मागील गेटने पोहोचले हॉटेलात

पणजी : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बंडखोर गटाचे सर्व आमदार बुधवारी रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी गुवाहाटीहून गोव्यातील दाबोळी विमानतळावर दाखल झाले. सुरक्षेच्या कारणावरून या सर्वांना विमानतळावरील पाठीमागील गेटमधून बाहेर काढण्यात आले. मीडियाला चकवा देत हे सर्वजण हॉटेलवर पोहोचले. विमानातून आलेले इतर प्रवासी आपापल्या सामानासह विमानतळाबाहेर पडल्यानंतर शिंदे गटाचे सर्व आमदार कडक सुरक्षा व्यवस्थेत कार्गो गेटने दोनापावल येथील ताज कन्व्हेंन्शन सेंटर हॉटेलमध्ये दाखल झाले.

आम्ही शिवसेना सोडलेली नाही. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे म्हणजेच आमचे नेते आहेत. मात्र, विधिमंडळाचे नेते म्हणून एकनाथ शिंदे यांचा आम्ही सन्मान करतो आणि त्यांच्या आदेशानुसार पुढील काम करणार आहोत
-दीपक केसरकर, बंडखोर गटाचे प्रवक्‍ते

मुख्यमंत्री सावंत यांनी घेतली शिंदेंची भेट

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांचा गट बुधवारी रात्री पणजीत दाखल झाला. त्यानंतर काही वेळातच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शिंदे यांची ताज कन्व्हेंन्शन सेंटर हॉटेलमध्ये भेट घेतली.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT