राजीनाम्यानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे… | पुढारी

राजीनाम्यानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे...

राजीनाम्याची घोषणा करताना उद्धव ठाकरे म्हणाले…

आता मी शिवसेना भवनात बसणार आहे. एका नवीन शिवसेनेची उभारणी परत नव्या जोमाने करणार असल्याचेही ते म्हणाले. शिवसेनाप्रमुखांनी रिक्षावाला, टपरीवाला, अगदी हातभट्टीवाल्यालाही मोठे केले. आमदारकी, खासदारकी, मंत्रिपदे दिल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आतापर्यंत ज्यांना मोठे केले, जे-जे द्यायचे ते दिले तेच आज नाराज आहेत. मात्र, ज्यांना काही मिळाले नाही ते मात्र ‘मातोश्री’वर येऊन मला साथ देत आहेत. जे नाराज झाले त्यांनी खरे तर सुरत, गुवाहाटीला न जाता ‘मातोश्री’वर येऊन तरी बोलायला पाहिजे होते. तुम्हाला आम्ही कधी तरी आपले मानले होते; मग मनातले सांगायची काय अडचण होती? असेही ते
म्हणाले.

लोकशाहीचा पाळणा हलू द्या; शिवसैनिकांनो, रस्त्यावर उतरू नका

गुवाहाटीला गेलेले सर्वजण परत येतील. नव्या सरकारची स्थापना होईल. नवी लोकशाही येत आहे. लोकशाहीचा पाळणा हलणार आहे. तो निश्‍चितच हलू दे. एकाही शिवसैनिकाने त्यांना रोखण्यासाठी रस्त्यावर उतरू नये. आज मुंबईत अभूतपूर्व बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तुकड्या उतरल्या आहेत. कदाचित सैन्यालादेखील बोलावतील. ज्या शिवसैनिकांनी या आमदारांच्या विजयाचा गुलाल उधळला होता त्यांच्याच रक्‍ताने इथले रस्ते माखलेले पाहणे मला आवडणार नाही. त्यामुळे या सगळ्यांना आरामात मुंबईत येऊ द्या. कोणीही त्यांना रोखू नये, असे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. उद्या होणारी फ्लोअर टेस्ट वगैरे प्रकारच मला आवडत नाही. केवळ डोकी मोजण्याचा हा प्रकार, हे लोकशाहीचे दुर्दैव आहे. मला त्यात रस नाही, असेही ते म्हणाले.

राज्यपालांनी ती यादीही मंजूर करावी

राज्यपालांनी आम्हाला तातडीने चोवीस तासांच्या आत फ्लोअर टेस्ट करण्याचे आदेश दिले. लोकशाहीचे त्यांनी पालन केले. आता अडीच वर्षांपासून जी 12 विधान परिषद सदस्यांची यादी त्यांच्याकडे पडून आहे ती त्यांनी आता तरी मंजूर करावी. तसे त्यांनी केल्यास त्यांच्याबद्दल आम्हाला असलेला आदर द्विगुणीत होईल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

शरद पवार-सोनिया गांधींचे मानले आभार

जे विरोधात होते ते आज माझ्या सोबत उभे राहिले; पण माझीच माणसे सोडून गेल्याचे दुःख व्यक्‍त करताना उद्धव ठाकरे यांनी शरद पवार आणि सोनिया गांधी यांचेही आभार मानले. सरकार चालविताना त्यांनी मला कायम साथ दिली. आज औरंगाबादचे संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशिव करतानाचा निर्णय घेताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी एका अक्षरानेही विरोध केला नाही. अशोक चव्हाण तर मला म्हणाले की, तुमच्या पक्षातील काही आमदारांचा जर आम्हाला विरोध असेल, तर आम्ही सरकारला बाहेरून पाठिंबा देतो; पण तुम्ही सरकार चालवा. आज संभाजीनगरचा निर्णय घेताना मी, आदित्य, सुभाष देसाई, अनिल परब हेच मंत्री होतो; पण जे पाहिजे होते ते नव्हते. हे सरकार आल्यापासून सगळे चांगले चालले होते. आम्ही महत्त्वाचे निर्णयही घेतले; पण चांगले चालल्याला नेहमीच नजर लागत असते. तशी या सरकारलाही ती लागली. ती कोणाची ते तुम्ही जाणता, असे भावनिक उद‍्गार त्यांनी काढले. आमच्या काळात राज्यात एकही धार्मिक दंगल झाली नाही. देशात सीएए, एनआरसीवरून वाद पेटलेला असताना महाराष्ट्र मात्र शांत होता.त्यासाठी मुस्लिम बांधवांनाही श्रेय दिले पाहिजे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Back to top button