पहिल्या कसोटीत पहिल्या डावात विराट कोहली एकही धाव करु शकला नाही. त्याला जेम्स अँडरसनने शुन्यावर बाद करत भारताला मोठा धक्का दिला. या विकेटबरोबरच अँडरसनने भारताचा महान फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.
अँडरसनने चेतेश्वर पुजाराला बाद केल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली मैदानावर आला. विराट कोहली भारताचा डाव सावरत मोठी धावसंख्या उभारून देणार अशी आशा होती. मात्र अँडरसनने पुढच्याच चेडूवर त्याला विकेट किपर जोस बटलर करवी झेलबाद केले.
विराटला बाद केल्यानंतर अँडरसनने भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे यांच्या कसोटी क्रिकेटमध्ये ६१९ विकेट घेण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट घेणाऱ्यांच्या यादीत अनिल कुंबळे तिसऱ्या स्थानावर आहेत. आता अँडरसनही त्यांच्यासोबत संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
या यादीत श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन पहिल्या स्थानावर आहे. त्याने ८०० कसोटी बळी घेतले आहेत. तर दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न ७०८ विकेटसह दुसऱ्या स्थानी विराजमान आहे.
दरम्यान, भारताने पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात सावध फलंदाजी केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी ९७ धावांची सलामी दिली. मात्र लंचला काही वेळ शिल्लक असताना रोहित ३६ धावांवर बाद झाला. त्यानंतर भारतीय फलंदाजीला गळती लागली.
लंचनंतर लगेचच चेतेश्वर पुजारा स्वस्तात माघारी परतला. पुढच्याच चेंडूवर विराट कोहली अँडरसनच्या गोलंदाजीवर भोपळाही न फोडता बडलरकडे झेल देत पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर अजिंक्य रहाणेही ५ धावा करुन धावबाद झाला. दरम्यान, पावसाचा व्यत्यय आल्याने खेळ थांबला त्यावेळी भारताच्या ४ बाद १२५ धावा झाल्या होत्या.
केएल राहुल अर्धशतक ( ५७ ) पूर्ण करुन नाबाद होता. तर ऋषभ पंत ७ धावा करुन नाबाद होता.
हेही वाचले का?
पाहा व्हिडिओ : ऑलिम्पियन तेजस्विनी सावंतची विशेष मुलाखत