नवी दिल्ली : भारतीय संघाने आता वर्ल्डकपमध्ये खेळणार्या आपल्या 11 खेळाडूंचा संघ निश्चित करावा आणि त्यांना प्रत्येक सामन्यात संधी द्यावी, असे म्हटले आहे. आता भारताने सामने जिंकण्यापेक्षा त्यांचा वर्ल्डकप संघ तयार करण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे, असा सल्ला वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याने भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांना दिला आहे.
क्रिकबज या स्पोर्टस् वेबसाईटशी बोलताना आशिष नेहरा म्हणाला, विश्वचषकाची वेळ जवळ आली आहे, आता सामन्याचा निकाल हा आमचा प्राधान्यक्रम नसावा. संघाने त्यांना काय हवे आहे ते ठरवायचे आहे. तीन फिरकी गोलंदाजांसह भारत घरच्या मैदानावर उतरणार आहे. ऑस्ट्रेलियात बहुतेक संघ असे करणार नाहीत. तो पुढे म्हणाला, संघात पाच गोलंदाज आहेत. याचा अर्थ तुम्ही गोलंदाजीकडे विशेष लक्ष देत आहात. कारण आगामी विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये आहे.
भारतीय संघ व्यवस्थापन आणि प्रशिक्षक वेगवान गोलंदाजीची काळजी घेत आहेत. आशिष नेहराच्या मते, भारतीय संघाने आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. फलंदाजीत भारत निर्धारित क्रमाने खेळला नाही. पाकिस्तानसमोरील 147 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला अडचणी आल्या. फलंदाजी क्रमाबाबतही संघात अनेक प्रश्न आहेत. टी-20 विश्वचषकापूर्वी संघ व्यवस्थापन याबाबत अधिक स्पष्ट होईल, अशी आशा आहे.