नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: लहान मुलांना लस चालू वर्षी दिली जाऊ नये, अशी शिफारस नॅशनल कोविड टास्क फोर्सने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला केली आहे.
पुढील वर्षीच्या जानेवारी ते मार्च महिन्यादरम्यान मुलांच्या लसीकरणाचा कार्यक्रम राबविला जाऊ शकतो, असे टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोडा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कोरोनाच्या पहिल्या तसेच दुसऱ्या लाटेदरम्यान विषाणूचा लहान मुलांवर कितपत परिणाम झाला, याचा अभ्यास करण्यात आला.
अभ्यासादरम्यान दोन ते बारा वर्षे वयोगटातील मुलांवर फारसा परिणाम झाला नसल्याचे दिसून आले आहे.
त्याचमुळे चालू वर्षी लहान मुलांना लस देण्याचे टाळले जावे, असे टास्क फोर्सचे म्हणणे आहे.
संशोधन समूहाने आपल्या शिफारशी विस्तृत स्वरूपात मंत्रालयाला पाठविल्या आहेत.
तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून लहान मुलांच्या लसीकरणाची योजना आखली जात आहे.
शिवाय विविध कंपन्यांकडून मुलांसाठीच्या लसीवर वेगाने काम सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सने दिलेल्या या शिफारशी महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत.
मुलांच्या आई-वडिलांना जितका कोरोनाचा धोका आहे, तितका मुलांना नाही, त्यामुळे मुलांचे लसीकरण लांबविले जाऊ शकते, असे डॉ. अरोडा म्हणाले.
ते पुढे म्हणाले, 'चालू वर्षाच्या अखेरपर्यंत सर्व टारगेटेड लोकांना लस देणे गरजेचे आहे. १८ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठीच्या लसीची परीक्षणे पार पडली आहेत.
अशा स्थितीत डिसेंबरनंतरच्या पुढील तीन महिन्यात म्हणजे जानेवारी ते मार्च २०२२ पर्यंत मुलांना लस दिली जाऊ शकते, अशी शिफारस आम्ही केली आहे.
जोवर मुलांचे पूर्णपणे लसीकरण केले जात नाही, तोवर शाळा उघडल्या जाऊ नयेत, यावरही आमचा भर आहे.
संसदीय समितीने ज्या शिफारशी दिलेल्या आहेत, त्या समितीत टास्क फोर्सचे तज्ज्ञदेखील सामील आहेत.
शाळेत येणाऱ्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले असेल तर शाळा उघडण्यास हरकत नाही.
मात्र याबाबतचा अंतिम निर्णय संबंधित राज्यांना करावा लागेल, असेही आमचे मत आहे.
पहा व्हिडिओ : कणखर सह्याद्री का ढासळतोय