Latest

रोहित शर्मा याची गच्छंती अटळ? बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

Arun Patil

मुंबई, वृत्तसंस्था : भारताची ऑस्ट्रेलियातील टी-20 वर्ल्डकपमधील निराशाजनक कामगिरीनंतर संघात नेतृत्व बदलाच्या चर्चांना ऊत आला होता. आता बीसीसीआयच्या एका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित शर्माला टी-20 संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकण्याची तयारी सुरू झाली आहे. याची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. भारतीय निवड समितीने रोहित शर्मा याला टी-20 संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्याचे जवळपास ठरवले आहे. भारतीय टी-20 संघाची धुरा हार्दिक पंड्याच्या खांद्यावर देण्यात येणार असल्याचेही सूत्रांकडून कळते आहे. मात्र वन-डे आणि कसोटी संघाचे नेतृत्व रोहितकडेच राहणार आहे.

इनसाईडस् स्पोर्टस्नुसार बीसीसीआयच्या एका सूत्रांनी सांगितले की, 'आता संघात बदल करण्याची वेळ आली आहे. आम्हाला अजूनही वाटते की रोहित शर्मा अजूनही बरेच काही देऊ शकतो. मात्र, त्याच्या खांद्यावर जबाबदारींचे मोठे ओझे आहे. रोहितचे वय वाढत चालले आहे हे देखील लक्षात ठेवायला हवे. 2024 च्या टी-20 वर्ल्डकपची आम्हाला तयारी करायची आहे. हार्दिक नेतृत्व करण्याच्या भूमिकेसाठी योग्य आहे. निवड समिती पुढच्या टी-20 मालिकेपूर्वी बैठक घेऊन हार्दिक पंड्या भारताच्या टी-20 संघाचा नवा कर्णधार असेल, अशी घोषणा करू शकते.'

हार्दिक पंड्या सध्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. यापूर्वी देखील त्याने वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. मात्र, न्यूझीलंडविरुद्ध युवा संघ घेऊन खेळणे आव्हानात्मक असणार आहे. हार्दिक पंड्याची ही मोठी परीक्षा असेल. याचबरोबर कर्णधार म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची देखील चांगली संधी असेल. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीदेखील आता रोहितला हटवून हार्दिक पंड्याकडे टी-20 संघाचे नेतृत्व देण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य केले होते. अनेक वरिष्ठ खेळाडूंनीदेखील याबाबतची मागणी केली आहे.

हेही वाचा…

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT