बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नी दोन्ही राज्यादरम्यान वाद पुन्हा भडकलेला आहे. असे असताना कर्नाटक पोलिसांना चकवा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज (मंगळवार) पहाटे बेळगाव परिसराला भेट दिली. बेळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे त्यांनी पूजन केले. येल्लूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. आपण सीमावासीयांच्या समवेत असून सीमाप्रश्न सोडवण्याचीसाठी आवश्यक प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी हुतात्मा स्मारक बांधकामासाठी आवश्यक निधी पुरविण्याचे आश्वासन रोहित पवार यांनी दिले. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, रमाकांत कोंडुसकर. आर. आय. पाटील, आर. एन. चौगुले, महेश जुवेकर, मदन बामणे यांच्यासह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान आमदार रोहित पवार बेळगावात दाखल झाल्याची माहिती कर्नाटक पोलिसांना मिळताच त्यांनी त्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यापूर्वीच रोहित पवार यांनी बेळगावहून महाराष्ट्राकडे कूच केली. त्यामुळे कर्नाटक पोलिसांना माघारी फिरावे लागले.
महाराष्ट्रातील मंत्री, लोकप्रतिनिधी यांना कर्नाटकात निर्बंध लादण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी बेळगावला अचानक भेट देऊन सीमाभागातील मराठी भाषिकांना दिलासा दिला आहे.
हेही वाचा :