महाराष्ट्र-कर्नाटक अहमदाबादेत आमनेसामने | पुढारी

महाराष्ट्र-कर्नाटक अहमदाबादेत आमनेसामने

अहमदाबाद; वृत्तसंस्था :  महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद टिपेला पोहोचलेला असताना सोमवारी पहिल्यांदाच अहमदाबाद विमानतळावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई समोरासमोर आले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात गुजरातेतही खल झाल्याचे सांगण्यात येते. मुख्यमंत्री शिंदे व मुख्यमंत्री बोम्मई परस्परांना भेटले आणि एकमेकांशी बोललेही. वादग्रस्त विधाने टाळावीत आणि सर्वोच्च न्यायालयात काय निकाल लागतो, त्याची प्रतीक्षा करावी, यावर तिन्ही नेत्यांचे एकमत बनल्याचे सांगण्यात येते.

मुख्यमंत्री शिंदे आणि मुख्यमंत्री बोम्मई यांच्यात महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. पण चर्चेचा तपशील समोर आलेला नाही. याउपर महाराष्ट्रासह कर्नाटकमधील पत्रकार आणि राजकीय विश्लेषकांचे या भेटीवर लक्ष केंद्रित झाले आहे. गुजरातचे नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या शपथविधी सोहळ्याला हे सारे एकत्रित आले होते. शपथविधीनंतर आपापल्या राज्यात परत जात असताना शिंदे, फडणवीस आणि बोम्मई यांची विमानतळाच्या विशेष कक्षात भेट झाली.

बोम्मई यांनी सोलापूर आणि सांगलीतील अनेक गावांवर कर्नाटकचा दावा ठोकला आहे. विशेष म्हणजे काही गावांनी स्वतःहून कर्नाटकात जाण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापलेले असून, त्याचे पडसादही सीमाभागात उमटलेले आहेत. सीमावादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. याउपर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हा वाद पुन्हा उकरून काढला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांनीही सीमेलगतच्या भागांसाठी महाराष्ट्राकडून योजना जाहीर केल्या. या सगळ्या शह-काटशहादरम्यान दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट होणे आणि दोघांत बोलणेही होणे महत्त्वाचे मानले जाते.

Back to top button