मिरची  
Latest

मिरची शेती व्यवस्थापन करताना अशी घ्या काळजी…

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : मिरची शेती व्यवस्थापन : आपल्या दैनंदिन जीवनात तिखट, गोड हे अत्यावश्यक असतो. आपल्या रोजच्या जेवणात तिखट हे लागतचं मिरचीची निवड योग्य करावी लागते. बाजारात मिरचीला १२ महिने मागणी असते. महाराष्ट्रासह इतर राज्यातही मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. भारतीय मिरचीला परदेशातही चांगली मागणी आहे. मिरची पिकाची लागवड जून, जूलै महिन्‍यात आणि उन्‍हाळी पिकाची लागवड जानेवारी, फेब्रूवारी महिन्‍यात करावी.

महाराष्‍ट्रात मिरचीची अंदाजे लागवड १ लाख हेक्‍टरी क्षेत्रावर होते. महाराष्‍ट्रातील मिरचीखालील एकूण क्षेत्राापैकी ६८ टक्‍के क्षेत्र नांदेड, जळगाव, धुळे, सोलापूर, कोल्‍हापूर, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, उस्‍मानाबाद या जिल्‍हयांमध्‍ये आहे. मिरचीमध्‍ये अ व क जीवनसत्‍व भरपूर प्रमाणात असल्‍याने मिरचीचा संतुलीत आहारात समावेश होतो.

मिरची शेती व्यवस्थापन करताना पेपर वापरल्यास तण कमी येते…

मिरची शेती व्यवस्थापन लागवड

कृषी तज्‍ज्ञांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मिरचीचे जिरायती पीक घेण्यासाठी सपाट जमिनीवर रोपे तयार केली जातात. बागायती पिकासाठी गादी वाफयावर रोपे तयार केली जातात. गादी वाफे तयार करण्‍यासाठी जमीन नांगरून आणि कुळवून भुसभुशीत केली जाते. यासाठी जमिनीत दर हेक्‍टरी २० ते २५ टन शेणखत मिसळावे. नंतर ४ फूट रूंद १० सेमी उंच आकाराचे गादी वाफे तयार करावेत. प्रत्‍येक गादी वाफ्यावर ३० किलो चांगले कुजलेले शेणखत आणि अर्धा किलो सुफला मिसळावे.

गादी वाफा पद्धत

त्‍यानंतर गादी वाफ्यावर बियांची पातळ पेरणी करावी व बी मातीने झाकून टाकावे. बियाण्‍यांची उगवण होईपर्यंत वाफ्यांना दररोज झारीने पाणी द्यावे. बी पेरल्‍यानंतर ३० ते ४० दिवसांनी रोपे लागवडीस तयार होतात.

उंच आणि पसरट वाढणाऱ्या जातींची लागवड ६० बाय ६० सेमी अंतरावर आणि बुटक्‍या जातींची लागवड ६० बाय ४५ सेमी अंतरावर करावी. कोरडवाहू मिरचीची लागवड ४५ बाय ४५ सेमी अंतरावर करावी.

रोपे गादीवाफ्यातून काढल्‍यानंतर लागवडीपूर्वी रोपांचे शेंडे १० लिटर पाण्‍यात १५ मिली मोनोक्रोफॉस ३६ टक्‍के प्रवाही अधिक २५ ग्रॅम डायथेनम ४५ अधिक ३० ग्रॅम पाण्‍यात मिसळणारे गंधक ८० टक्‍के मिसळलेल्‍या द्रावणात बुडवून लावावेत.

खते आणि पाणी व्‍यवस्‍थापन

वेळेवर वरखते दिल्‍यामुळे मिरची पिकाची जोमदार वाढ होते. मिरचीच्‍या कोरडवाहू पिकासाठी दर हेक्‍टरी ५० किलो नत्र ५० किलो स्‍फूरद आणि ओलिताच्‍या पिकासाठी दर हेक्‍टरी १०० किलो नत्र ५० किलो स्‍फूरद आणि ५० किलो पालाश द्यावे. यापैकी स्‍फूरद आणि पालाश यांची पूर्ण मात्रा आणि नत्राची अर्धी मात्रा रोपांच्‍या लागवडीच्‍या वेळी द्यावीत. नत्राची उर्वरीत अर्धी मात्रा रोपांच्‍या लागवडीनंतर ३० दिवसांनी बांगडी पध्‍दतीने द्यावी.

गुंटूर मिरची चटणीसाठी वापरली जाते

मिरची शेती व्यवस्थापन आंतरमशागत

मिरचीच्‍या रोपांच्‍या लागवडीनंतर २० ते २५ दिवसांनी पहिली खुरपणी करावी त्‍यानंतर तणांच्‍या तीव्रतेनुसार खुरपण्‍या करून शेत तणविरहीत ठेवावे. खरीप मिरचीला लागवडी नंतर २ ते ३ आठवडयांनी रोपांना मातीची भर दयावी.

हवामान

उष्‍ण आणि दमट हवामानात मिरची पिकाची वाढ चांगली होऊन उत्‍पादन चांगले मिळते. मिरची पिकाची लागवड पावसाळा, उन्‍हाळा आणि हिवाळा या तिन्‍ही हंगामात करता येते. पावसाळात जास्‍त पाऊस व ढगाळ वातावरण असल्‍यास फूलांची गळ जास्‍त होते. पाने व फळे कुजतात. मिरचीला ४० इंचापेक्षा कमी पाऊस असणे चांगले. मिरचीच्‍या झाडांची आणि फळांची वाढ २५ ते ३० सेल्सिअस तापमानाला चांगली होते आणि उत्‍पादनही भरपूर येते. तापमानातील तफावतीमुळे फळे, फुले गळ मोठया प्रमाणात होते. व उत्‍पन्‍नात घट येते. बियांची उगवण १८ ते २७ सेल्सिअस तापमानास चांगली होते.

जमीन

पाण्‍याचा निचरा होणा-या ते मध्‍यम भारी जमिनीत मिरचीचे पीक चांगले येते. हलक्‍या जमिनीत योग्‍य प्रमाणात सेंद्रीय खते वापरल्‍यास मिरचीचे पीक चांगले येते पाण्‍याचा योग्‍य निचरा न होणा-या जमिनीत मिरचीचे पीक घेऊ नये.

पावसाळयात तसेच बागायती मिरचीसाठी मध्‍यम काळी आणि पाण्‍याचा उत्‍तम निचरा होणारी जमीन निवडावी.

उन्‍हाळयात मध्‍यम ते भारी जमिनीत मिरचीची लागवड करावी. चुनखडी असलेल्‍या जमिनीतही मिरचीचे पीक चांगले येते.

संकेश्वरी मिरची

मिरचीच्या जाती

पुसा ज्‍वाला : या जातीची झाडे बुटकी व भरपूर फांद्या असतात.

फळ वजनदार व खुप तिखट असते. पिकलेली फळे लाल रंगाची असतात.

पंत सी – १ : लाल वाळलेल्‍या मिरचीच्‍या उत्‍पादनाला ही जात चांगली आहे. या जातीची फळे

उलटी असतात. मिरची पिकल्‍यावर आकर्षक लाल रंग दिसतो.

संकेश्‍वरी ३२ : या जातीची झाडे उंच असतात. मिरची २० ते २५ सेमी लांब असून पातळ सालीची असतात. सालीवर सुरकुत्‍या असतात. वाळलेल्‍या मिरचीचा रंग गर्द लाल असतो. या मिरचीची वापर चटणी करण्यासाठी केला जातो. कर्नाटकात याचे जास्त उत्पादन घेतले जाते.

मुसाळवाडी – या जातीची झाडे उंच वाढतात. खरीप हंगामासाठी ही जात चांगली असून बोकडया, भूरी आणि डायबॅक या रोगांना कमी प्रमाणात बळी पडतात.

याशिवाय राज्यातील विद्यापीठांनी विकसीत केलेंडर अग्निरेखा, परभणी टॉल , फूले ज्‍योती, कोकणक्रांती, फूले मुक्‍ता फूले सुर्यमुखी, एनपी- ४६ या सारख्‍या अधिक उत्‍पादन देणाऱ्या जाती लागवडीयोग्‍य आहेत. हेक्‍टरी १ ते दीड किलो बियाणे वापरावे.

रोग आणि किड

मर : हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो. रोपाचा जमिनी लगतचा खोडाचा भाग आणि मुळे सडतात. त्‍यामुळे रोप कोलमडते.

उपाय : १० लीटर पाण्‍यात ३० ग्रॅम कॉपरऑक्‍झीक्‍लोराईड ५० टक्‍के मिसळून हेक्‍टरी रोपांच्‍या मुळा भोवती ओतावे.

फळे कुजणे आणि फांद्या वाळणे : ( फ्रूट रॉट अँड डायबॅक ) हा रोग कोलीटोट्रीकम कॅपसीसी या बुरशीमुळे होतो.

या रोगाचा प्रादूर्भाव झालेल्‍या हिरव्‍या किंवा लाल मिरचीवर वतुर्ळाकार खोलगट डाग दिसतात.

दमट हवेत रोगाचे जंतू वेगाने वाढतात आणि फळावर काळपट चटटे दिसतात. अशी फळे कुजतात आणि गळून पडतात.

बुरशीमुळे झाडाच्‍या फांद्या शेंडयाकडून खाली वाळत जातात. प्रथम कोवळे शेंडे मरतात.

रोगांचा प्रादुर्भाव जास्‍त प्रमाणात झाल्‍यास झाडे सुकून वाळतात तसेच पानांवर आणि फांद्यांवर काळे ठिपके दिसतात.

मिरची शेती व्यवस्थापन करताना योग्य काळजी घेणे गरजेचे असते

उपाय : या रोगाची लक्षणे दिसताच शेंडे खुडून त्‍यांचा नाश करावा.

तसेच डायथेन झेड-७८ किवा डायथेन एम ४५ किंवा कॉपर ऑक्सिक्‍लोराईड यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक औषध २५ ते ३० ग्रॅम १० लीटर पाण्‍यात मिसळून रोग दिसताच दर १० दिवसांच्‍या अंतराने ३ ते ४ वेळा फवारावे.

भुरी ( पावडरी मिल्‍डयू ) : भूरी रोगामुळे मिरचीच्‍या पानाच्‍या वरच्‍या आणि खालच्‍या बाजूवर पांढरी भूकटी दिसते.

या रोगाचा प्रादूर्भाव जास्‍त प्रमाणात झाल्‍यास झाडाची पाने गळतात.

उपाय : भुरी या रोगाचा प्रादुर्भाव दिसताच ३० ग्रॅम पाण्‍यात मिसळणारे गंधक किंवा १० मिलीलिटर कॅराथेन १० लीटर पाण्‍यात मिसळून मिरचीच्‍या पिकावर १५ दिवसांच्‍या अंतराने दोन फवारण्‍या कराव्‍यात.
किड

फूलकिडे :

हेक्‍टरी किटक आकाराने अतिशय लहान म्‍हणजे १ मिली पेक्षा कमी लांबीचे असतात. त्‍यांचा रंग फिकट पिवळा असतो.

किटक पानावर ओरखडे पाडून पानाचे रस शोषण करतात. त्‍यामुळे पानाच्‍या कडा वरच्‍या बाजूला चुरडलेल्‍या दिसतात.

हेक्‍टरी किटक खोडातील रसही शोषून घेतात. त्‍यामुळे खोड कमजोर बनते व पानांची गळ होते.

उपाय : रोपलावणीपासून ३ आठवडयांनी पिकावर १५ दिवसांच्‍या अंतराने ८ मिलीमीटर डायमेथेएम १० लीटर पाण्‍यात मिसळून फवारावे.

मावा : हेक्‍टरी किटक मिरचीची कोवळी पाने आणि शेडयांतील रस शोषण करतात. त्‍यामुळे नविन पालवी येणे बंद होते.

उपाय : लागवडीनंतर १० दिवसांनी १५ मिली मोनोक्रोटोफॉस ३६ टक्‍के प्रवाही १० लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी.

मिरची शेती व्यवस्थापन काढणी व उत्‍पादन

हिरव्‍या मिरचीची तोडणी साधारणपणे लागवडीनंतर अडीच महिन्‍यांनी सुरु होते.

पूर्ण वाढलेल्‍या व सालीवर चमक असलेल्‍या हिरव्‍या फळांची तोडणी देठासह १० दिवसांच्‍या अंतराने करावी.

साधारपणपणे हिरव्‍या मिरच्‍यांची तोडणी सुरु झाल्‍यानंतर ३ महिने तोंडे सुरू राहातात.

अशा प्रकारे ८ ते १० तोडे सहज होतात. वाळलेल्‍या मिरच्‍यांसाठी त्‍या पूर्ण पिकून लाल झाल्‍यावरच त्‍यांची तोडणी करावी.

जातीपरत्‍वे ( बागायती) हिरव्‍या मिरच्‍यांचे हेक्‍टरी ८० ते १०० क्विंटल उत्‍पादन मिळते.

वाळलेल्‍या लाल मिरच्‍यांचे उत्‍पादन ९ ते १० क्विंटल निघते. व कोरडवाहू मिरचीचे उत्‍पादन ६ ते ७ क्विंटल येते.

हेही वाचलं का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT