Latest

बेळगाव : बिबट्या एकटा, ३०० चा फौजफाटा, तरीही सापडेना

अनुराधा कोरवी

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : दोन आठवड्यांपासून गोल्फ मैदान परिसरात ठाण मांडलेल्या बिबट्याच्या शोधासाठी शुक्रवारी पोलिस आणि वन खात्याच्या 300 जणांच्या संयुक्त फौजफाट्याने रेस कोर्स परिसर पिंजून काढला. पण बिबट्या हाती लागला नाहीच. त्यामुळे परिसरातील रहिवाशांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

उद्या शनिवारीही शोधमोहीम सुरू राहणार आहे. दरम्यान, शोध मोहिमेदरम्यान अनेक जवानांना आपत्कालीन हेल्मेटऐवजी दुचाकी चालवताना वापरली जाणारी हेल्मेट वापरावी लागली वन खाते व पोलिस दलाकडून संयुक्त शोध मोहीम घेण्यात आली होती. त्यामुळे बिबट्याच्या तपासाकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले होते. सुमारे300 कर्मचार्‍यांनी शुक्रवारी दुपारनंतर दोन तास मोहीम राबवली. मात्र सुगावा लागला नाही.

गोल्फ मैदान परिसरात असलेल्या बिबट्या नागरिकांना निदर्शनास आला आहे. मंगळवारी व बुधवारी रात्रीच्या वेळी सलग दोनदा अरगन तलाव व महात्मा गांधी चौक परिसरात बिबट्या आढळला होता. त्यामुळे बिबट्या रात्रीच्या वेळीच बाहेर पडत असावा, असा अंदाज आहे. सलग दोन दिवस बिबट्या दिसल्याचे सिद्ध झाल्यानंतर शुक्रवारी नव्याने शोध मोहीम आखण्यात आली.

गोल्फ मैदानाजवळील बेळगाव क्लब येथे एकत्र जमून बिबट्याच्या शोधासाठी अराखडा तयार करण्यात आला. शोध मोहीम सुरू करण्यापूर्वी जिल्हा वनाधिकारी डॉ. ऍन्थॉनी मरियम, एसीएफ मंजुनाथ कुसनाळ, पोलिस उपायुक्त रवींद्र गडादी, एसीपी नारायण बरमणी यांनी चर्चा केली. त्यानंतर सुमारे 300 जवानांना सूचाना देण्यात आल्या. नागरी वस्तीत बिबट्या शिरू नये यासाठी कोणकोणत्या ठिकाणी बंदोबस्त केला पाहिजे, तिथे नाकाबंद करण्यात आली.

बिबट्या दिसताक्षणी बेशुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणारी शस्त्रेही मदतीला घेण्यात आली. जवानांना आत्मसुरक्षेची साधनसामग्री देण्यात आली. एअर गन, बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक असणारी जाळी, लाईफ जॉकेट आदी साहित्य घेऊन तपास सुरू करण्यात आला. मात्र सुमारे दोन तास शोधून पूर्ण गोल्फ मैदान परिसर पिंजून काढल्यानंतर बिबट्याचा माग सापडला नाही.

सामग्री अपुरी

शोधपथकातील काही जवानांकडे एअर गन आणि ट्रँक्विलायझर गन (प्राण्याला बेशुद्ध करणारी बंदूक) वगळता बाकीच्या जवानांकडे केवळ काठ्या होत्या. अनेक जवानांकडे आपत्कालीन हेल्मेट नव्हती. त्यांनी दुचाकी चालवताना वापरली जाणारी हेल्मेटेच परिधान केली होती. बिबट्याने अचानक हल्ला केल्यास काय, हा प्रश्न होताच.

वाचा :

गोल्फ मैदान परिसरात आढळून आलेल्या बिबट्यामुळे परिसरात दहशत आहे. त्याला जेरबंद करण्यासाठी वनखाते व पोलिस खात्याकडून 250 पेक्षा अधिक कर्मचार्‍यांच्या मदतीने दोन तास तपास मोहीम राबविण्यात आली.
– रवींद्र गडादी, पोलिस उपायुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT