पर्यटनस्थळावर मुक्कामासाठी आता ‘कॅराव्हॅन’ची सुविधा | पुढारी

पर्यटनस्थळावर मुक्कामासाठी आता ‘कॅराव्हॅन’ची सुविधा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यात विविध भागांत असलेला पर्यटनस्थळांवर मुक्काम करण्यासाठी वैयक्तिक कॅराव्हॅन वापरण्यास प्रारंभ झाला आहे. त्यानुसार तीन कॅराव्हॅनना परवानगी देण्यात आली आहे. विदेशात कॅराव्हॅन पर्यटनस्थळावर मुक्कामासाठी वापरण्यात येत आहेत. त्याच धर्तीवर गुजरात, केरळ या राज्यांत कॅराव्हॅन धोरण राबविण्यात आले आहे. त्यानुसारच राज्यातही कॅराव्हॅनच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्यात येत आहे. राज्यात निसर्गरम्य ठिकाणे, ऐतिहासिक किल्ले, दुर्गम भाग, वनसंपदा, ऐतिहासिक वारसास्थळे, लेणी आणि धरणे अशी अनेक पर्यटनाची ठिकाणे आहेत.

यातील अनेक ठिकाणी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील परिसर असल्याने पक्के बांधकाम करता येत नाही. परिणामी हॉटेल वा निवासस्थानांच्या सोयी कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. अशा भागात कॅराव्हॅन किंवा कॅम्परव्हॅनच्या मदतीने पर्यटकांना निवासाच्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्यभरातून तीन कॅराव्हॅनना पर्यटन विभागाकडून परवानगी देण्यात आली आहे. ही वाहने कृषी पर्यटन केंद्र, एमटीडीसी निवासस्थाने किंवा खासगी हॉटेल यांसारख्या परिसरात उभी करता येणार आहेत.

याबाबत पुणे विभागाच्या पर्यटन उपसंचालक सुप्रिया करमरकर-दातार म्हणाल्या, ‘पर्यटन संचालनालयाकडे कॅराव्हॅन पार्कची नोंदणी आवश्यक आहे. या पर्यटन संकल्पनेमुळे पर्यटकांना राहण्याची सुविधा; तसेच खासगी गुंतवणुकीस प्रोत्साहन मिळणार आहे. कौटुंबिक सहलींचे आयोजन, हॉटेल्स आणि रिसॉर्ट या पारंपरिक निवास व्यवस्थेपेक्षा वेगळा अनुभव, ना विकास क्षेत्राचा योग्य वापर, दुर्गम भागातील पर्यटनाला चालना देणे यामुळे शक्य होणार आहे. यामध्ये लहान – मोठ्या आकाराच्या कॅराव्हॅन उभ्या करता येतील. असे पार्क खासगी किंवा शासकीय जमिनीवर स्वत: जमीन मालक किंवा विकासक उभारू शकणार आहेत.’

वाहनतळाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा; तसेच स्वतंत्र पाणी, रस्ते व वीज जोडणी असेल. मात्र, सध्या राज्यात कॅराव्हॅन पार्क उपलब्ध नसल्याने परवानगी देण्यात आलेल्या तीन कॅराव्हॅन कृषी पर्यटन केंद्रे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची (एमटीडीसी) निवासस्थाने किंवा खासगी हॉटेल यांच्या परिसरातच उभी करावी लागणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

परवानगीसाठी येथे अर्ज करा
कॅराव्हॅन पार्क तसेच हायब्रीड कॅराव्हॅन पार्कची नोंदणी पर्यटन संचालनालयाच्या संकेतस्थळावर करता येईल. अधिक माहितीसाठी 020-29900289 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उपसंचालक सुप्रिया करमरकर दातार यांनी केले आहे.

 

Back to top button