औरंगाबाद : 86 पैकी शिक्षा फक्त तिघांनाच! अपघातांच्या गुन्ह्यांत दोषसिद्धी अत्यल्प | पुढारी

औरंगाबाद : 86 पैकी शिक्षा फक्त तिघांनाच! अपघातांच्या गुन्ह्यांत दोषसिद्धी अत्यल्प

औरंगाबाद : जीवघेणा अपघात झाल्यास वाहनचालकावर वेगवेगळ्या कलमांन्वये गुन्हा दाखल होतो. त्याच्या निष्काळजीपणामुळे आपल्या व्यक्तीचा जीव गेलेला असतो, त्यामुळे त्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा मृताचे नातेवाईक करीत असतात, परंतु अपघाताच्या गुन्ह्यात शिक्षेचे प्रमाण अत्यल्प असल्याचे आकडेवारीवरून दिसते. ग्रामीण पोलिसांच्या रेकॉर्डवरील अपघातांच्या 86 गुन्ह्यांचा निकाल 2022 मध्ये आला. त्यांपैकी केवळ तीन गुन्ह्यांत शिक्षा लागली. गतवर्षी 236 गुन्ह्यांचा निकाल लागला, त्यांतील केवळ 15 गुन्ह्यांत शिक्षा लागली. पोलिसांच्या तपासातील त्रुटी आणि पंच, साक्षीदार फितूर होण्याचे प्रमाण अधिक असल्याने कन्व्हिक्शन (शिक्षा) मिळत नाही, असे अ‍ॅड. देविदास हराळ यांनी सांगितले.

शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक माजी आ. विनायक मेटे यांचा कार अपघातात मृत्यू झाला. याशिवाय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचादेखील 3 जून 2014 रोजी पहाटे दिल्लीत कार अपघातातच मृत्यू झाला होता. तसेच, 11 ऑगस्ट रोजी शहरात भावाला राखी बांधून सासरी निघालेल्या बहिणीला बसस्थानकावर सोडण्यासाठी जाणार्‍या भावाच्या दुचाकीला कारने उडविल्याने बहिणीचा मृत्यू झाला होता. जिवघेण्या अपघातांच्या घटना घडल्यानंतर मृताच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसतो. अनेक संसार उघड्यावर येतात. मात्र, ज्याच्या निष्काळजीपणामुळे हे जीव गेले, त्या चालकाचे पुढे काय होते, हे दैनिक ‘पुढारी’ने जाणून घेतले असता निराशाजनक चित्र समोर आले. या चालकांवर गुन्हे दाखल होतात, पण ज्या कलमान्वये हे गुन्हे नोंद होतात, त्यात तीन वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे आरोपींना तत्काळ जामीन होतो. तपास करून पोलिस दोषारोपपत्र न्यायालयात सादर करतात. न्यायालयात वर्षानुवर्षे सुनावणी चालते. तोपर्यंत अनेक खटल्यांत साक्षीदार, पंच फितूर होतात. तपासात त्रुटी असतात. या सर्वांचा फायदा आरोपी चालकाला होतो आणि तो निर्दोष सुटतो.

अपघातास कारणीभूत ठरणार्‍या वाहन चालकाविरुद्ध 279, 304 (अ), 337, 427 या कलमांन्वये गुन्हा दाखल होतो. यात तीन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. मुळात अपघात कोणाच्या तरी चुकीमुळे घडतो. त्यात जीव घेण्याचा उद्देश नसतो. त्यामुळे सदोष मनुष्यवधाचे कलम लागत नाही. तपासात पोलिसांकडून अनेक त्रुटी राहतात. न्यायालयात पंच, साक्षीदार अनेकदा फितूर होतात. किरकोळ बाबींकडे पोलिस मुद्दाम दुर्लक्ष करतात. त्यामुळे अपघाताच्या गुन्ह्यात शिक्षेचे प्रमाण अत्यल्प आहे.

– देविदास हराळ, वकील.

Back to top button