Latest

बीड : दोन लाख घेऊन नवरीने बांधली ‘रेशीमगाठ’ आठ दिवसांत फिरवली नवरदेवाकडे ‘पाठ’

backup backup

बीड; पुढारी वृत्तसेवा : वंशाला दिवा हवा, या अट्टहासापायी दिवसेंदिवस मुलींचा जन्मदर घटत आहे. मुले व मुली यांच्या व्यस्त प्रमाणामुळे गावोगावी अनेक मुले लग्नाविनाच राहत आहेत. आपली लग्ने आता होणार का ? या चिंतेत मुलांसह त्यांचे पालकही चिंतेत आहेत. याचाच फायदा घेत, फसवून लग्न लावण्याचे प्रमाण आता दिवसेंदिवस वाढत असताना गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथे विवाह या पवित्र नात्यावरील दृढ विश्वास उडवणारी सिनेस्टाईल घटना समोर आली आहे.

तळणेवाडी येथील कृष्णा अशोक फरताळे नावाचा युवक व त्यांचे कुटूंब मोल मंजुरी करून आपल्या उदरनिर्वाह करतात कृष्णा हा साधारण गरीब घरातील मुलगा लग्न जमत नाही म्हणून घरातील आई वडिल नेहमी चिंताग्रस्त असत. त्यातच कृष्णाचा शेवगाव तालुक्यातील रामकृष्ण जगन्नाथ तापडिया (रा. सालवडगाव ता. शेवगाव जि. नगर) या इसमाशी परिचय झाला व लग्न जमवून देतो म्हणून कृष्णाला सांगितले.

तापडिया यांनी काही दिवसांत कृष्णाला औरंगाबाद येथील रेखा चौधरीचे स्थळ आणले. अनेक दिवसांपासून लग्न जमत नव्हते व मुलाला मुलगी पसंद झाली काही दिवसांनी तापडिया यांनी लग्न करायचे असेल, तर मुलीकडील लोक पैसे मागत असल्याचे सांगितले तुम्ही दोन लाख देत असाल, तर लग्न जमवत असे सांगितले. कृष्णाच्या घरच्यांनी व्याजाने पैसे काढून आपल्या मुलाचा संसार सुरळीत व्हावा म्हणून होकार दिला व कृष्णा व रेखाचा विवाह 20 जुलै रोजी बोरीपिंपळगाव फाट्यावरील मंगल कार्यालयात अगदी धुमधडाक्यात लावून दिले.

कृष्णा यांनी दिलेला धनादेश आठ दिवसांत वठताच रेखा माहेरी जाते म्हणून निघून गेली. कृष्णाने पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर, पोलिसांनी नवरी मुलगी, मुलीची आई बनावट मामा व मध्यस्थी व्यक्तीला अटक केली आहे.

यात रेखा बाळू चौधरी, नवरी मुलगी, तिची आई सुनिता चौधरी (रा. जाधव वाडी, सिडको औरंगाबाद), मुलीचा मामा म्हणून मिरवणारा बनावट मामा विठ्ठल किशनराव पवार (रा.औरंगाबाद) व मुख्य सुत्रधार रामकिसन जगन्नाथ तापडिया (रा. सालवडगाव, ता. शेवगाव जि. नगर) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

विशेष म्हणजे यात मुलीचे पहिले लग्न झाले असून दोन अपत्य आहेत. यातील एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे . या कारवाईत पोलीस उपअधीक्षक स्वप्नील राठोड, पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगुलवार, सह पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांच्या मार्गदर्शन खाली साजेद सिद्दीकी, सुरेश पारधी, नवनाथ गोरे आदींनी चार आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे

लग्न हा विषयी मुळात खूप नाजूक आहे. सोयरिक जमवताना चार नातेवाईकांकडून सखोल चौकशी करावी थोडा जरी संशय व्यक्त झाला तर पोलिसांशी संपर्क करावा निश्चित आम्ही सहकार्य करू
सपोनि प्रफुल्ल साबळे गेवराई

बनावट लग्नातील नवरी रेखा व तिच्या आईला काल गेवराई पोलिसांनी औरंगाबाद येथून अटक केल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून पुढील तपास चालू असल्याची माहिती तपास अधिकारी साजेद सिद्दिकी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT