मनोहर भोसले 
Latest

बाळूमामाच्या नावानं चांगभलं : ‘मनोहर भोसलेचा फोटो काढा; अन्यथा मालिका बंद पाडू’

दीपक दि. भांदिगरे

मुदाळतिट्टा (जि. कोल्हापूर); प्रा. शाम पाटील : एका मराठी वाहिनीवरून प्रसारित होत असलेल्या 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेतील मनोहर भोसले याचा फोटो त्वरित काढा; अन्यथा तीव्र आंदोलन उभा करू व मालिका प्रसारण बंद पाडू, असा इशारा आदमापूर ग्रामस्थांसह बाळूमामा भक्तांनी दिला आहे.

ग्रामपंचायतीच्या वतीने तशी मागणी करणारे पत्र निर्माता संतोष आयाचित यांना पाठवले आहे. याबरोबरच बाळूमामा देवालय समितीच्या वतीनेही भोसले याचा निषेध करण्यात आला आहे.

बाळूमामांच्या वंशजावरून आदमापूर (ता. भुदरगड) येथील ग्रामस्थ व बाळूमामा भक्तगण आणि उंदरगाव (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील मनोहर चंद्रकांत भोसले यांच्यात नवा वाद निर्माण झाला आहे.

आता एका वाहिनीवरून प्रसारित होत असलेल्या 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' मालिकेतील मनोहर भोसले याच्या फोटोवर ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आहे. आमचा मालिकेला विरोध नाही; पण प्रारंभी जो भोसले याचा फोटो दाखवला जातो त्याला आमचा विरोध आहे. या फोटोमुळेच भोळीभाबडी भक्तमंडळी त्याच्या आहारी जात आहेत असे दिसते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

आदमापूर परिसरातील काही गावांमधील सुज्ञ नागरिक यांचा थेट उंदरगावाशी संबंध आला आहे. ज्यावेळी मनोहर भोसले आदमापूर परिसरात आला त्यावेळी त्याच्या गाडीतून काहीजण फिरले आहेत. त्यात काही नेतेमंडळींचा समावेश आहे. यामुळेच त्याने या परिसरात हात-पाय पसरायला सुरुवात केल्याचे बोलले जात आहे.

भोसलेबाबत भक्तांमध्ये प्रचंड चीड आहे. आपली मोठ्या प्रमाणात फसगत झाली असल्याचेही भक्त बोलत आहेत.

बाळूमामा देवालय समितीकडूनही निषेध

बाळूमामा यांच्या नावाचा गैरवापर करून आपला आर्थिक लाभ उठवणारा मनोहर भोसले (उंदरगाव) याचा बाळूमामा देवालय समितीने ठरवाद्वारे निषेध केला आहे. या ठरावाला लक्ष्मण पाटील सूचक, तर गोविंद पाटील अनुमोदक आहेत.

आता खुलासा; पण तेव्हा मूक संमतीच

राज्यभर वाद पेटल्यावर मनोहर भोसले याने वृत्तवाहिन्यांना आपण बाळूमामांचे वंशज नाही, अवतार नाही, मी फक्त त्यांचा भक्त आहे, असे स्पष्टीकरण दिले आहे; पण यापूर्वी त्याचे विविध कार्यक्रम आयोजित केले गेले तिथे किंवा यूट्यूबवरील व्हिडिओंमध्ये थेट भोसले याचा उल्लेख बाळूमामा यांचे वंशज असा केला आहे.

त्यावेळी भोसले याने आता खुलासा दिला तसा न देता उलट आपल्या वंशज म्हणून लाँचिंगला मूक संमतीच दिली. यावरूनदेखील भक्तांमध्ये तीव्र संताप आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : एक एकर टोमॅटो शेतीसाठी खर्च किती आणि हातात मिळतात किती ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT