नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा
पुणे-नाशिक महामार्गावरील खोडद बायपास चौकात उड्डाणपूल बांधण्यात न आल्याने एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे संतप्त झालेल्या खोडद व हिवरे येथील ग्रामस्थांनी रास्ता रोको करून या ठिकाणी पूल बांधण्यात यावा, तसेच आमदार व खासदार डॉ. अमोल कोल्हे हे दि. ४ डिसेंबरपर्यंत येथे येऊन भेट देऊ शकत नसल्याने तोपर्यंत हा बायपास बंद ठेवण्यात यावा अशी मागणी केली. सोबतच मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचा अंत्यविधी चौकातच करण्याची भूमिका घेतली होती. यावर उशीरापर्यंत काहीही तोडगा निघाला नव्हता.
कल्पना योगेश भोर (वय २८, रा. हिवरे तर्फे नारायणगाव) असे अपघातात मृत पावलेल्या महिलेचे नाव असून प्रकाश अबाजी भोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश किसन भोर व त्यांची पत्नी मृत कल्पना हे मंगळवारी (दि. २३) योगेशची बहीण संगीता कोरडे हिला दवाखान्यातून घेऊन येत होते. यावेळी पुणे-नाशिक महामार्गावर खोडद बायपास चौकात एका मारुती स्विफ्ट डिझायर (एमएच १७ एफ ७२७२) या गाडीने भरधाव वेगात त्यांना उडवले.
या घटनेत योगेश, पत्नी कल्पना व बहीण संगीता हे गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी पुणे येथे दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान कल्पना यांचा शुक्रवारी (दि. २६) मृत्यू झाला. या बायपासला खोडद चौकामध्ये उड्डाणपूल बांधण्यात यावा, अशी मागणी वेळोवेळी खोडद व हिवरे येथील ग्रामस्थांनी केली होती; मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात झाल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी रास्ता रोको करून या महिलेचा अंत्यविधी चौकातच करण्यासाठी रास्ता रोको केला होता.
तहसीलदार रवींद्र सबनीस, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, नारायणगावचे पोलिस पोलीस निरीक्षक विलास देशपांडे व सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, राष्ट्रवादीचे नेते अमित बेनके, नारायणगावचे सरपंच बाबू पाटे, सुरज वाजगे यांनी नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला असता रात्री उशिरा ९ वाजेपर्यंत यावर कुठलाच निर्णय झाला नाही
दरम्यान संतप्त नागरिकांनी या ठिकाणी उड्डाणपूल न झाल्यास वारंवार अपघात होऊन जीव जाणार आहेत त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करतानाच या ठिकाणी गतिरोधक असूनही वाहने वेगाने जातात. या चौकात दिवे नाहीत, शाळा चालू झाल्यामुळे लहान मुलांच्या ये-जा करण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याचबरोबर उड्डाणपूल मागणी होती; मात्र ती मंजूर झाली नाही, त्यामुळे आमदार व खासदार जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात यावा अशी मागणी केली.
दुर्दैवाने निधन झालेल्या या बहिणीच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सामील आहे. या बायपासवरील खोडद चौकामध्ये फेज ३ च्या बांधकामात उड्डाणपूल करण्यात यावा या मागणीचा प्रस्ताव मी सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांना पाठवला आहे व ३० नोव्हेंबरला त्यांच्याबरोबर माझी बैठक आहे. त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याबाबत चर्चा करणार आहे. सद्य परिस्थितीत महामार्गाच्या अधिकाऱ्यांना लगेचच या चौकात हायमॅक्स बसवून वाहतुकीच्या संदर्भात योग्य ती उपाययोजना करण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत.
– डॉ. अमोल कोल्हे, खासदार, शिरूर
बायपासला खोडद चौकात उड्डाण पूल करण्याऐवजी दुचाकी वाहनांसाठी भुयारी मार्ग करण्यात यावा ही भूमिका आमची पहिली होती आणि आत्ताही आहे. कारण या चौकात दुचाकींचे अपघात होतात. त्यामुळे राजकारण न करता नागरिकांचे प्रश्न ऐकून त्यावर मार्ग काढावा.
– बाबू उर्फ योगेश पाटे, सरपंच, नारायणगाव
हे ही वाचलं का ?