धुळे ; पुढारी वृत्तसेवा : धुळे पाऊस अपडेट : धुळे जिल्ह्यात पहाटेपर्यंत मुसळधार पावसाने झोडपून काढले. धुळे शहरालगत ललिंग कुरण क्षेत्रात झालेल्या पावसाने शहरातून जाणाऱ्या नाल्यांचे पाणी वसाहतीमध्ये शिरले. यामुळे अनेक ठिकाणी नागरिक रात्रभर जागे राहत पहारा दिला.
धुळे परिसरात मध्यरात्री जोरदार पावसाला सुरुवात झाली. पहाटेपर्यंत हा पाऊस सुरू राहिल्याने अवधान औद्योगिक वसाहतीमधून व ललिंग वनक्षेत्राचे पाणी नाल्यामधून शहरात शिरले.
शहरातील लक्ष्मीवाडी भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने या नागरिकांनी घरांना कुलूप लावून सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.
सहजीवन नगर, कोळवले नगर या भागातील वस्तीत पावसाचे पाणी साचल्याने रस्ते पाण्याखाली गेले. भागातील नाले सफाई केली नसल्याने मुख्य प्रवाह बंद झाला होता.
यामुळे रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने कित्येक घरांमध्ये पाणी गेले आहे.
शहरातही तिरंगा चौक, आझाद नगरातील वसाहती मध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे.
लक्ष्मीवाडी भागात गेल्या ३० वर्षां पासून पाणी शिरते आहे. पण प्रशासन नागरिकांना दिलासा देत नाही. याभागात अवैध पणे कामे केली गेली असून महापालिका नाले सफाई करीत नाही. त्यामुळे या पुराचा सामना गरीब वस्तीला करावा लागतो.
प्रत्येक वर्षी पुरामुळे नुकसान होऊन देखील महसूल विभाग केवळ कागदावर पंचनामे करतात, पण गरिबांना नुकसान भरपाई मिळत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या नीलम व्होरा यांनी केला आहे.