कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
चित्रपटसृष्टीच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेल्या कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओची जागा राज्य शासनाने ताब्यात घेऊन या ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन करावे. स्टुडिओचा विकास करावा, अशी मागणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबईत भेटून केली. मंत्री शिंदे यांनीही सकारात्मक भूमिका घेत तत्काळ स्टुडिओची जागा ताब्यात घेण्यासाठी प्रस्ताव पाठवावा, अशी सूचना महापालिकेला केली आहे.
जयप्रभा स्टुडीओ जागेचा प्रश्न लवकरच निकाली काढू, अशी ग्वाही मंत्री शिंदे यांनी दिली आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ऋतुराज क्षीरसागर व पुष्कराज क्षीरसागर उपस्थित होते.
क्षीरसागर म्हणाले, स्वरसम्राज्ञी कै. लता मंगेशकर यांनी जयप्रभा स्टुडिओची जागा खरेदी केली होती. त्यापैकी बहुतांश जागा मंगेशकर यांनी काही वर्षांपूर्वी विकली. उर्वरित जागेचा समावेश महापालिकेने हेरिटेज वास्तूत केला आहे. परंतु, खासगी जागा असल्याने आणि मंगेशकर कुटुंबीयांनी जागा विक्रीसाठी काढल्याने महालक्ष्मी स्टुडीओज एल.एल.पी. या फर्मने कायदेशीररीत्या खरेदी केली आहे. मुलांनी जागा खरेदी करण्यात भागीदारी गुंतवली असली, तरी जनभावनेचा आदर करून योग्य त्या सूचना कंपनीच्या सर्वच भागीदारांना दिल्या आहेत. स्टुडिओबाबत कोल्हापूरवासीयांच्या भावना जोडल्या आहेत.
खरेदीदार कंपनीस नियमाप्रमाणे शासनाने पर्यायी जागा देऊन जयप्रभा स्टुडीओची जागा शासनाने ताब्यात घ्यावी. त्यासंदर्भात कंपनीच्या सर्वच भागीदारांना सहमती दर्शविली आहे. तसेच महापालिकेकडे शासकीय नियमानुसार पर्यायी जागा देवून जागा ताब्यात घेण्यासाठी लेखी मागणी केली आहे. नगरविकास विभागाने नियमाप्रमाणे पर्यायी जागा देवून जयप्रभा स्टुडीओची जागा शासनाने ताब्यात घेवून विकसित करावी, स्टुडीओ विकसित करावा. याठिकाणी पूर्ववत चित्रपट निर्मिती स्टुडीओ उपलब्ध करून देवून हा विषय कायमस्वरूपी मार्गी लावावा. या ठिकाणी चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, स्वरसम्राज्ञी कै.लता मंगेशकर यांचे स्मारक व्हावे, ऐतिहासिक वास्तूंचे जतन व्हावे, अशी मागणीही केली असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.
ऐतिहासिक शालिनी सिनेटोनचे नामोनिशान मिटविण्यात आले आहे. त्या वादात आपल्याला पडायचे नाही; मात्र त्यावेळी अशाप्रकारे तीव्र आंदोलन झाली नाहीत. जयप्रभा स्टुडिओत माझ्या मुलांची नावे आल्याने त्याला राजकीय रंग देण्यात आला आहे. विरोधकांनी माझी धास्ती घेतली आहे. पोटनिवडणुकीच्या तोंडावर मला बदनाम करण्यासाठी मोठे राजकीय षड्यंत्र रचले आहे. राजकीयद़ृष्ट्या मला संपविण्यासाठी प्रत्येक निवडणुकीवेळी विरोधकांचा डाव असतो. परंतु, विरोधक त्यात यशस्वी होणार नाहीत. कारण, राजकारणापेक्षा मी समाजकारणाला महत्त्व देतो. जयप्रभा स्टुडिओचे संवर्धन करून कलाकारांसाठीच तो जतन केला जाईल, असेही क्षीरसागर यांनी सांगितले.