लंडन : सर्वात सुखी माणसाचा सदरा शोधण्यात माणसाचे आयुष्य संपून जाऊ शकते. मात्र, काही लोकांच्या चेहर्याची रचनाच अशी असते की ते हसत आहेत असे वाटावे! असाच एक प्राणी आहे जो नेहमी हसतमुखच दिसतो. त्याला अनेक लोक 'जगातील सर्वात आनंदी प्राणी' असेही म्हणतात!
या प्राण्याकडे पाहिले की वाटते तो जणू काही हसतच आहे. त्याच्या चेहर्याची रचनाच तशी असल्याने हा भास होत असतो. मात्र, या हसतमुख प्राण्याकडे अनेक लोक आकर्षित होतात. या प्राण्याचे नाव आहे 'क्वॉका'. पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या दलदलीच्या भागात आणि जंगलांमध्ये हा प्राणी आढळतो. तो उंदरासारखा दिसत असला तरी त्याचा आकार मात्र एखाद्या मांजराइतका मोठा असतो.
हे प्राणी 'मार्सुपियल्स'च्या कुळात येतात. या कुळातील प्राण्यांच्या माद्या आपल्या पोटावरील पिशवीत पिल्लांना ठेवतात. ऑस्ट्रेलियातीलच कांगारू या कुळातील आहेत. क्वॉका प्राणी त्याच्या हसर्या चेहर्यामुळे पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहेत. अनेक पर्यटक त्यांच्याबरोबर सेल्फीही घेतात. जणू काही हे प्राणी कॅमेर्याकडे पाहून हसत आहेत असा भास त्यामधून होतो. रॉटनेस्ट बेटावरही हे प्राणी मोठ्या संख्येने आढळतात.