सातारा : प्रवीण शिंगटे 'काय ती टेबलं, काय त्या खुर्च्या, सगळं कसं ओक्केच हाय!' अहो ऐकावं ते नवलच. जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात म्हणे नऊ लाखांची नवलाई अवतरलीय. बघावं तिकडं कसं चकाचक. समदंच नवं नवं. डोळे दिपवणारा स्वर्गच अवतरल्याचा भास व्हावा असं हे सभागृह बघण्यासारखं झालंय. झेडपी वर्तुळात त्याचीच चर्चा सुरू असून चक्क अधिकारी व कर्मचारीच 'काय ती झाडं'च्या तालावर त्याचं वर्णन करू लागलेत. मात्र वर्षा – दोन वर्षाला लाखो रुपयांची उधळपट्टी करून सभागृह नूतनीकरणाची ही घाई कशाला, असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे.
सातारा जिल्हा परिषदेचे स्थायी समिती सभागृह महत्त्वाचे समजले जाते. या समितीच्या सभागृहात स्थायी, जलसंधारण व अन्य समितीच्या सभा होत असतात. तसेच विविध विभागाच्या आढावा बैठकाही या सभागृहात होतात. त्यामुळे या स्थायी समिती सभागृहाला एक आगळं वेगळं महत्त्व आहे. जिल्हा परिषद प्रशासनामार्फत स्थायी समिती सभागृहाचे नूतनीकरण नुकतेच करण्यात आले. सभागृहाला कार्पोरेट लूक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 'काय ती टेबलं, काय त्या खुर्च्या, काय ते पीओपी, काय तो कलर, काय ते लायटींग, काय त्या खिडक्या, काय ते पडदे, असं सर्व काही ओक्केच बनवले आहे. त्यामुळे डोळे दिपवणारा स्वर्गच अवतरल्याचा भास स्थायी समितीच्या सभागृहात निर्माण झाला आहे. मात्र वर्षा दोन वर्षाला या सभागृहाच्या नुतनीकरणासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करुन वारंवार नुतनीकरणाचा घाट घातला जात आहे.
या सभागृहात सर्व खुर्च्या नव्याने बसवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पडदे, सर्व लायटींग नव्याने केले आहे. साऊंड सिस्टिम, खिडक्या, कलर, जिल्हा परिषदेचा लोगो, जिल्ह्यातील प्रसिध्द मंदिराच्या प्रतिकृती असलेल्या फोटो फ्रेमसह अंतर्गत सजावटीसाठी सुमारे 9 लाख रुपयाहून अधिक खर्च झाला आहे. या खर्चांचा भुर्दंड कर स्वरुपात सर्वसामान्यांना बसणारा आहे. काही गरज नसताना लाखो रुपयांची उधळपट्टी कशासाठी केली जात आहे? असा उद्वीग्न सवाल जिल्हा परिषदेमध्ये कामानिमित्त आलेल्या जिल्हावासियांना पडत आहे. मनमानीपणे जनतेच्या पैशाची उधळपट्टी करून नुतनीकरणाच्या कामाचे बील अव्वाच्या सव्वा करुन घेणार्या अधिकार्यांची सखोल चौकशीची मागणी होत आहे.त्याचबरोबर वारंवार नुतनीकरणाचा घाट घालून विविध विभागांच्या कार्यालयांसाठी गरज नसताना कोटी रुपयांचा चुराडा करणार्यांच्या मनमानी कारभाराला वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींनी वेळीच लगाम घालावा, अन्यथा कर स्वरुपात गोळा झालेल्या जिल्हावासियांच्या पैशांचा अपव्यय अजून वाढेल, अशी खंत सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.
दोन व्हीसी रूमसाठी 35 लाखांचा चुराडा…
जिल्हा परिषदेमध्ये कोरोना काळात सुसज्ज अशी अत्याधुनिक यंत्रणा वापरून व्हीसी रूम उभारण्यात आली आहे. या रूमसाठी तब्बल 26 लाखांचा खर्च आल्याचे अधिकार्यांनी त्यावेळी सांगितले होते. ही रूम उभारून काही कालावधी होतो न होतो तोच आणखी एक व्हीसी रूम उभारण्याचा काही अधिकार्यांनी घाट घातला. त्यासाठी सुमारे 9 लाखांचा खर्च झाला असून झेडपीत सध्या कार्यरत असलेल्या दोन्ही व्हीसी रूमसाठी काही कारण नसताना तब्बल 35 लाख रुपयांचा चुराडा केला गेल्याचा आरोप होत आहे.
हेही वाचा