

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : भाजपकडे 106 आमदार असताना विधान परिषद निवडणुकीत आम्हाला 134 आमदारांचे पाठबळ असल्याचे स्पष्ट झाल्याने मुख्यमंत्रिपदावर भाजपचा हक्क होता. मुख्यमंत्रिपद मागितले असते, तर ते आम्हाला मिळाले असते. मात्र, राज्याच्या हितासाठी आणि हिंदुत्वाच्या संरक्षणासाठी पक्षाने बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले, असा खुलासा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केला.
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याच्या निर्णयाची आम्हा पाचजणांना माहिती होती. त्यामुळे पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाचे आश्चर्य वाटले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे हे गेली अनेक वर्षे शिवसैनिक आहेत. ते बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहेत. शिवसेना वाढविण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासारख्यांनी घाम गाळला आहे. सर्वाधिक आमदार असतानाही हिंदुत्वासाठी लढणार्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्याग केला. तसेच नव्या सरकारने चांगल्यारीतीने काम करण्यासाठी पक्षाच्या आदेशानुसार फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले. त्यांच्या त्यागाचा भाजपला अभिमान असून, त्यांनी कार्यकर्त्यांसमोर पक्षशिस्तीचा आदर्श निर्माण केला आहे, असेही पाटील म्हणाले.