कराची ; वृत्तसंस्था : वकार युनुस सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो ट्विटच्या माध्यमातून क्रिकेट विश्वातील घडामोडींवर भाष्य करत असतो. सध्या त्याने पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या दुखापतीविषयी एक ट्विट केले आहे.
शाहीन आफ्रिदी दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेत खेळू शकणार नाही. परिणामी, पाकिस्तानी संघात शाहीन आफ्रिदी नसणे म्हणजे भारतीय संघाच्या पहिल्या फळीतील फलंदाजांसाठी हा दिलासा म्हणावा लागेल, असे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार युनुस ट्विटच्या माध्यमातून म्हणाला आहे. त्याच्या याच ट्विटमुळे तो ट्रोल होत आहे.
मागील वर्षी यूएईमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेदरम्यान शाहीन आफ्रिदीने भारताच्या पहिल्या फळीतील विराट कोहली, रोहित शर्मा, के.एल. राहुल या दिग्गज फलंदाजांना तंबूत पाठवले होते. कोणत्याही संघाची कामगिरी ही पहिल्या फळीतील फलंदाजांवरच अवलंबून असते. हा इतिहास पाहता वकार युनुसने शाहीन आफ्रिदीची दुखापत म्हणजे पहिल्या फळीतील भारतीय खेळाडूंसाठी दिलासा आहे, असे मत मांडले आहे.
शाहीन आफ्रिदीच्या जागी हसन अलीला संधी?
आशिया चषक 2022 ची स्पर्धा तोंडावरच असताना पाकिस्तान संघातील प्रमुख गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी त्याच्या दुखापतीमुळे बाहेर झाला. आफ्रिदीच्या जागेवर पाकिस्तानच्या संघात कोणाला स्थान मिळणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या संघात वेगवान गोलंदाज हसन अलीचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे.
मागील वर्षी पार पडलेल्या टी-20 विश्वचषकात त्याला प्रभावशाली गोलंदाजी करण्यात अपयश आले होते. मात्र, एक घातक गोलंदाज म्हणून त्याची सर्वत्र ख्याती आहे. टी-20 विश्वचषकातील खराब प्रदर्शनामुळेच त्याला आशिया चषकाच्या संघातून वगळण्यात आले होते. मात्र, आता आफ्रिदीची कमतरता भरून काढण्यासाठी त्याचा संघात समावेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही.