पुढारी ऑनलाईन डेस्क : महान नाटकाकार विल्यम शेक्सपिअरचा २३ एप्रिल हा जन्मदिन व स्मृतीदिन हा जगभरात पुस्तक दिवस म्हणून साजरा केला जातो. शेक्सपिअरच्या अनेक नाटकांनी जगभरातील विविध भाषांमधील वाडःमयावर प्रभाव टाकला आहे. आजही त्यांचा साहित्याच्या चाहतावर्ग जगभरात पसरला आहे. आता त्यांची नाटकं पुन्हा चर्चेत आली आहेत. सॉदबी या लिलाव संस्थेने पुढील महिन्यात त्यांच्या नाटकांच्या पुस्तकांचा संचाचा लिलाव आयोजित केला आहे. सीएनएन या वृत्तसंस्थेने याबाबतची बातमी दिली आहे.
शेक्सपिअरच्या नाटकं संकलीत केलेल्या एका पुस्तकाचा चार आवृतीचां संच तब्बल ४.५ दशलक्ष पाऊंडला (किंवा ६ मिलीयन डॉलर्स) विक्री होईल. (भारतीय रुपयात अंदाजे ५१ कोटी) असा अंदाज सॉदबी या लिलाव संस्थेने वर्तवला आहे. सॉदबी या लिलाव संस्थेने बुधवारी, म्हणजे शेक्सपियर यांच्या ४६१ व्या जयंतीदिनी, या लिलावाची घोषणा केली. २३ मे रोजी होणाऱ्या या लिलावात प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ पुस्तकांचा संच एकत्रित विक्री केला जाणार आहे. शेक्सपिअर यांच्या पुस्तकांचा असा संच १९८९ सालानंतर प्रथमच लिलावात येत आहे.
१६१६ मध्ये विल्यम शेक्सपियर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर शेक्सपिअर यांनी लिहलेल्या नाटकांचा एकत्रित संग्रह जॉन हेमिंग्ज आणि हेन्री कॉन्डेल या त्यांच्या मित्रांनी तयार केला. हे दोघे मित्र शेक्सपियरच्या ‘द किंग्स मेन’या नाट्यमंडळाचे अभिनेते होते.
‘मिस्टर विल्यम शेक्सपिअर कॉमेडीज, इतिहास आणि शोकांतिका’ असे या पुस्तकांचे नाव आहे. याला ‘फर्स्ट फोलिओ’ असे म्हणतात. या खंडात एकूण ३६ नाटके होती, त्यापैकी निम्मी यामध्ये प्रथमच प्रकाशित झाली होती. दुसरा संच ( सेकंड फोलिओ ) १६३२ मध्ये प्रकाशित झाला. तर तिसरा १६६३ मध्ये आणि चौथा १६८५ मध्ये प्रकाशित झाला. पहिल्या संचाचे वैशिष्ट्य असे त्यांच्या मित्रांनी हा नाटकांचा एकत्रित संच तयार केला नसतातर ‘मॅकबेथ’, ‘द टेम्पेस्ट’ आणि ‘ट्वेल्थ नाईट’ यासारखी शेक्सपिअर यांची महत्वाची नाटके काळाच्या ओघात हरवली असतीत असे मत अनेक अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
१६२३ साली या फोलिओच्या सुमारे ७५० प्रती छापल्या गेल्या, त्यापैकी सुमारे २३० प्रती आज अस्तित्वात आहेत. यातील बहुतांश प्रती संग्रहालये, विद्यापीठे किंवा ग्रंथालयांमध्ये आहेत. यातील काही खासगी मालकांच्या संग्रहात आहेत यातील एक २०२० साली साधारण ९.९ मिलियन डॉलरला विकला गेला होता. यामधील फर्स्ट फोलिओ हा जरी महत्वाचा असला तरी तिसरा फोलिओ अधिक दूर्मिळ असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. या संग्रहालायाच्या केवळ १८२ प्रती सध्या शिल्लक आहेत. १९६६ मध्ये लंडनमध्ये लागलेल्या भीषण आगीत यातील बऱ्याच प्रती जळाल्या होत्या.