

ठाणे : अनुपमा गुंडे
नाट्यगृहांचे भाडे, कलाकारांचा प्रवास खर्च, परगावी नाटक नेल्यावर कलाकारांची निवास व्यवस्था, खाण्या - पिण्याचा खर्च, टोल, जाहिरात व प्रसिद्धी खर्च... हे एका पारड्यात तर दुसरीकडे मुंबई - ठाणे वगळता इतरत्र नाटकाला हमखास प्रेक्षक येतील याची श्वाश्वती नसल्याने प्रयोगाचा किमान खर्च तरी भरून येईल की नाही, याची टांगती तलवार ... खर्च आणि उत्पन्नाच्या व्यस्त गणितामुळे दिवसेंदिवस मुंबई - ठाण्याबाहेरील उर्वरित महाराष्ट्रातील नाट्यगृहात नाटकांचे प्रयोग करणं निर्मात्यांना डोईजड होत आहे.
केवळ नाटक करण्याची हौस आणि प्रेमापोटी निर्मिती संस्था शो मस्ट गो ऑन या भावनेनं नाटकाच्या प्रयोगाचा गाडा ओढत आहेत. राज्य शासनाने राज्यातील नाट्यगृहांच्या भाड्यात सुसुत्रता आणून जागतिक रंगभूमी दिनी नाट्यप्रेमींना दिलासा देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
राज्यात सध्या गंभीर, कौटुंबिक, विनोदी अशी सुमारे 40 ते 50 नाटके रंगभूमीवर आहेत. या नाटकांना मुंबई, ठाणे, कल्याण - डोंबिवली, पनवेल या महानगरात प्रेक्षक वर्गाचा अपेक्षित प्रतिसाद आहे, तर काही नाटके हाऊस फुल्लचा बोर्ड झळकत आहे. नाशिक, पुणे, कोल्हापूर, सांगली, अहमदनगर, नागपूर या महानगरात आणि सांस्कृतिकदृष्ट्या या महानगरांच्या तुलनेत मागासलेल्या असलेल्या भागात प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळेल, याची श्वाश्वती आजही नाट्यसंस्थाना नाही, त्यामुळे मुंबई महानगरीय क्षेत्रात व्यक्तीरिक्त उर्वरित महाराष्ट्रात नाटकाचा प्रयोग लावण्याचे धाडस करायला धजावत नाही, तर बोटावर मोजण्याइतक्या संस्था आर्थिक झळ सोसून केवळ प्रेमापोटी नाटकांचे प्रयोग उर्वरित महाराष्ट्रात करत असल्याचे वास्तव अनेक नाट्यसंस्थांच्या प्रमुखांनी मान्य केले.
राज्यात केवळ नाट्यगृहांची दुरावस्था, अस्वच्छता हेच विषय कायम चर्चिले जातात, ती दुरावस्था आहेच, पण मुंबई - ठाण्यात एका प्रयोगाचा खर्च पावणे दोन लाखाच्या घरात आहेत. हे नाटक मुंबई बाहेर करून जायला आम्हांला आवडते, पण नाट्यगृहांचे भाडे 20 ते 30 हजारांच्या पुढे, कलाकारांचा प्रवासाचा खर्च, निवास व्यवस्था हे खर्च धरून उर्वरित महाराष्ट्रात प्रयोगाचा खर्च दोन ते अडीच लाखाच्या घरात जातो,मुंबई - ठाण्यात नाटक प्रतिसादात असले तरी उर्वरित जिल्ह्यात नाटकाला तो प्रतिसाद मिळेल, याची श्वाश्वती देता येत नाही. दिवसेंदिवस बाहेर नाटक करणं अवघड होत आहे.
दिलीप जाधव - नाट्य निर्माते, ठाणे, मुंबई
बाहेरगावी नाटक नेण्याचा नियोजित खर्च असतोच, पण मुंबई - ठाणे वगळता उर्वरित महाराष्ट्रात नाटकाचे प्रयोग नेटानं करणारे स्थानिक व्यवस्थापक फारसे उरले नाहीत, त्यांची जागा घेणार्या पुढच्या पिढीला इव्हेंट मध्ये रस आहे, त्यामुळे ते नाटकाऐवजी विनोदी कलाकारांच्या स्किट्सचे इव्हेंट करतात. नाटकाचा प्रयोग बाहेरगावी करण्यासाठी पाठबळाची गरज आहे, ते पाठबळ अजूनही मिळत नाही, हे वास्तव आहे.
चंद्रकांत लोकरे, खजिनदार, जागतिक मराठी नाट्यनिर्माता संघ
मुंबई - ठाण्यात नाटकाला प्रतिसाद मिळतो, ईकडे 4 पैसे मिळतात, म्हणून इथं प्रयोग करतोच, पण उर्वरित महाराष्ट्रात 2 पैसे मिळतात, म्हणून तिकडे प्रयोग करायचा नाही, असं म्हणून कसं चालेल, तिकडच्या प्रेक्षकांपर्यंत नाटक पोहचले पाहिजे ना, उत्पन्नात, नाटकाच्या प्रतिसादात उन्नीस -बीस होणारच, पण प्रयोग तर व्हायला हवेत.
भरत जाधव - अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक