

लंडन : इंग्रजी साहित्याला अजरामर अक्षरलेणे बहाल केलेला विश्वविख्यात नाटककार व कवी म्हणजे विल्यम शेक्सपिअर. शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’, ‘ऑथेल्लो’, ‘रोमिओ अँड ज्युलिएट’, ‘मॅकबेथ’ यासारखी अनेक नाटके तसेच सॉनेट्स म्हणजेच सुनिते जगभरातील अनेक भाषांमध्ये भाषांतरीत झालेली आहेत. सोळाव्या शतकातील या महान साहित्यिकाचा जन्म इंग्लंडच्या स्ट्रॅटफोर्ड-अपॉन-एव्हन या छोट्याशा, पण टुमदार गावात झाला. ज्या घरात त्याचा जन्म झाला व तरुण वयात अॅना हॅथवेशी लग्न केल्यानंतर ज्याने पाच वर्षे जिथे आपला संसार थाटला, ते हेन्ले स्ट्रीटवरील त्याचे घर अद्यापही जसेच्या तसे जतन करून ठेवण्यात आलेले आहे.
सन 1564 मध्ये याच घरात शेक्सपिअरचा जन्म झाला. त्याचे लहानपण व तरुण वयातील अनेक वर्षेही याच घरात गेली. आता हे घर जगभरातील लोकांसाठी एक छोटेसे म्युझियम बनलेले आहे. शेक्सपिअर बर्थप्लेस ट्रस्टकडून ते चालवले जाते. हे घर सोळाव्या शतकातील म्हणजेच महाराणी एलिझाबेथ पहिल्या यांच्या काळातील घरे, जीवनपद्धती, भांडीकुंडी, स्वयंपाक अशा अनेक गोष्टींची झलक दाखवते. लाकडी बांधकाम असलेले हे घर काही फार भव्य किंवा सुंदर आहे असे नाही. मात्र, या घराला शेक्सपिअर नामक सोन्याचा स्पर्श झालेला आहे आणि ते आजही सोळाव्या शतकात माणसाला घेऊन जाणारे असल्याने खास बनले आहे. या घरातील स्वयंपाकघर, तेथील भांडी, बरण्या, केक भाजण्याची चूल, शयनकक्ष, फर्निचर, घराजवळचा बगीचा हे सर्व काही पाहण्यासारखेच आहे. जगभरातील पर्यटक या घराला भेट देत असतात. ‘जसेच्या तसे टिकवून ठेवणे’ याबाबत ब्रिटिशांचा हातखंडा आहे. अनेक जुन्या गोष्टी इंग्रजांनी टिकवून ठेवलेल्या आहेत; पण त्यामध्ये शेक्सपिअरच्या या घराचे महत्त्व वेगळेच आहे.