नांदेड ः मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नांदेडकरांसमोर सादर केलेल्या ‘विकासनामा’च्या मुखपृष्ठावर स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांच्या छायाचित्रांना स्थान देताना, माजी महापौर सरजीतसिंघ गील यांचे छायाचित्र खाली तर नवखे माधव पावडे यांना मोठ्या नेत्यांसोबत विराजमान करण्यात आल्यामुळे पक्षातील धुसफूस समोर आली आहे.
‘राष्ट्रवादी’च्या या चिखलीकरमय विकासनामाचे प्रकाशन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. नंतर या पक्षाच्या नेत्यांनी वार्ताहर बैठक घेत आपला वचननामा प्रसिद्धी माध्यमांकडे दिल्यानंतर त्याची आता चिकित्सा होत आहे.
गील हे पक्षातील शीख धर्माचे एक अनुभवी नेते व महानगर कार्याध्यक्ष आहेत. त्यांच्या तुलनेत नवख्या असलेल्या पावडे यांना अधिक महत्त्व दिले गेले. ज्येष्ठ नेते भास्करराव खतगावकर यांच्या स्नुषा डॉ.मीनल पाटील ह्या पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष आहेत; पण त्यांचे छायाचित्र वगळण्यात आल्यामुळे हा गट नाराज झाला.
माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा हे महानगराध्यक्ष असले, तरी विकासनाम्यात त्यांचे मनोगत प्रकाशित करण्यात आले नाही. पक्षाचा जाहीरनामा जारी करण्याचा विषय पोकर्णा यांनी आधी आपल्या हाती घेतला होता; पण नंतर तो चिखलीकरांच्या ताब्यात गेला, असे सांगण्यात आले.
ज्येष्ठ नेते भास्करराव खतगावकर यांच्या मनोगतास स्थान मिळाले; पण चिखलीकर यांनी पक्षाचे धोरण मांडताना अधिक जागा व्यापली. त्यात त्यांनी आपले विरोधक अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध टिकेचे शब्दबाण सोडले आहेत.
नांदेडच्या विकासासाठी ‘राष्ट्रवादी’ कटिबद्ध
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या विकासनामामध्ये पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी नांदेडकरांना कारभारी बदलण्याचे आवाहन केले, तर नांदेडच्या विकासासाठी ‘राष्ट्रवादी’ कटिबद्ध असल्याची ग्वाही प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांनी त्यांच्या मनोगतात दिली आहे.