Maharashtra Municipal Elections : प्रचाराचा आज ‌‘सुपरसंडे‌’

मतदार गाठीभेटीसाठी उमेदवारांची होणार दमछाक
Maharashtra Municipal Elections
प्रचाराचा आज ‌‘सुपरसंडे‌’pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : ‌‘ताई, माई, आक्का...‌’, ‌‘कोण आला रे कोण आला...‌’ अशा विविध घोषणांनी संभाजीनगरसह मराठवाड्यातील जालना, परभणी, लातूर, नांदेड ही शहरे दुमदुमली असून, महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने प्रचार कालावधीतील आजचा रविवार सुट्टीचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आजचा दिवस सत्कारणी लावण्यासाठी मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी उमेदवारांची दमछाक होणार आहे; तर शहरात कार्यकर्त्यांच्या पदयात्रा, कॉर्नर सभा आणि नेत्यांच्या रॅलींची धूम दिसणार आहे. त्यामुळे आजचा दिवस प्रचाराचा ‌‘सुपर संडे‌’ ठरणार आहे.

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून, 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा 13 जानेवारी रोजी थंडावणार आहेत. त्यामुळे प्रचाराला अवघे तीनच दिवस शिल्लक असल्याने रविवारपासून शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात होणार आहे. शेवटच्या टप्प्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस, शिवसेना (उबाठा), मनसे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी यांच्या प्रमुख नेत्यांच्या सभांनी गाजणार असून, आरोप-प्रत्यारोपांनी प्रचाराचा खऱ्या अर्थाने धुरळा उडणार आहे. त्यातच शेवटच्या प्रचाराच्या टप्प्यात आज, हा रविवार सुट्टीचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे.

Maharashtra Municipal Elections
AIFF Film Festival 2026 | अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान आयोजन

सुट्टीच्या निमित्ताने घरी असलेल्या जास्तीत जास्त मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांची भेट घेण्यासाठी उमेदवारांनी फिल्डिंग लावली आहे. त्यासाठी उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांबरोबर नियोजन केल्याने शहरातील प्रत्येक गल्ली, इमारतींमध्ये घोषणांचा बार उडणार असून, प्रचाराचा उत्साह शिगेला पोहोचणार आहे. त्याचबरोबर बाईक रॅली, पदयात्रा, नेत्यांच्या सभेबरोबरच रोड शो, रात्रीची कॉर्नर सभा कुठे घ्यायची याची सर्व तयारी उमेदवारांनी केली आहे. त्यामुळे रविवार सत्कारणी लावण्यासाठी उमेदवारांची लगीनघाई झाल्याचे पाहायला मिळणार आहे.

नितेश राणेंच्या संभाजीनगरात तीन सभा

भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ मंत्री नितेश राणे यांच्या रविवारी संभाजीनगरात तीन सभा होत आहे. पद्मपुऱ्यात सायं. 6 वाजता पहिली सभा होईल. दुसरी सभा गुलमंडी येथे सायं. 7 वाजता आणि रात्री 8 वाजता पुंडलिकनगर येथे तिसरी सभा होणार आहे. या सभेला ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड, जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांची प्रमुख उपस्थिती असेल.

संभाजीनगरात आज शिंदेची सभा

शहरातील 29 प्रभागातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रविवारी (दि.11) दुपारी 3 वाजता येथील टीव्ही सेंटर, हडकोतील मैदानावर सभा होणार आहे. या सभेला सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ, खा. संदीपान भूमरे, आ. प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, संपर्कप्रमुख विलास पारकर यांच्यासह अन्य नेते उपस्थित राहणार आहे.

ठाकरे बंधूंची ‌‘शिवतीर्था‌’वर सभा

महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात रविवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व मनसे यांची संयुक्त सभा दादर येथील शिवतीर्थावर होत आहे. पालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची शुक्रवारी नाशिकमध्ये पहिली सभा झाली आहे. दोन्ही ठाकरे बंधूंची रविवारी मुंबईत पहिलीच सभा होत आहे.

Maharashtra Municipal Elections
Minor Sexual Assault Case : अल्पवयीन भाच्यावर अत्याचार, मामीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

मुख्यमंत्र्यांचा पिंपरीत रोड शो

रविवारी जास्तीत जास्त सभा घेण्यावर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी भर दिला आहे. त्यामुळे विविध शहरांत राजकीय पक्षांबरोबरच कार्यकर्त्यांची धावपळ दिसणार आहे. भाजप नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशिकमध्ये जाहीर सभा आहे, तर पिंपरी-चिंचवड येथे त्यांचा रोड शो आयोजित केला आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पनवेल आणि पुणे येथे जाहीर सभा होणार आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व खासदार सुनील तटकरे यांची मुंबईत प्रचार सभा होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news