Rahul Gandhi White T-Shirt : 
Latest

‘अग्निपथ’ विरोधात काँग्रेसचे २७ जूनला राज्यव्यापी आंदोलन : नाना पटोले

अमृता चौगुले

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : केंद्रातील मोदी सरकारने सैन्य भरतीसाठी आणलेली 'अग्निपथ' ही योजना सैन्यात कंत्राटी पद्धत लागू करणारी आहे. केवळ चार वर्षांची सेवा करून तरुणांना परत बेरोजगारीत ढकलण्याचा हा डाव आहे. लष्करी सेवेत भरती होऊन देशाची सेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या धाडसी तरुणांच्या भवितव्याशी भाजप सरकारने खेळ मांडला आहे. काँग्रेस पक्षाचा 'अग्निपथ' योजनेला विरोध असून तरुणांच्या व देशाच्या हितासाठी सोमवार दि. २७ जूनला राज्यभर या योजनेविरोधात तीव्र आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, केंद्र सरकारने आणलेली 'अग्निपथ' योजना ही चार वर्षांची सेवा करून तरुणांना पुन्हा वाऱ्यावर सोडून देणारी आहे. चार वर्ष लष्करी सेवेत कर्तव्य बजावलेल्या जवानांना ऐन उमेदीच्या काळात उघड्यावर सोडून देणे हा त्यांचा अपमान करणारे आहे. चार वर्षांच्या सेवेनंतर या अग्निविरांना भाजपा कार्यालयात चौकीदाराची नोकरी देऊ, असे विधान भाजपाचे नेते करत आहेत. यातूनच भाजपाचे जवानांबद्दलचे बेगडी प्रेम दिसून देते. देशसेवा करणाऱ्या जवानांचा अपमान आम्ही कदापी खपवुन घेणार नाही. सैन्यदलात केवळ चार वर्षांची सेवा म्हणजे देशाच्या सुरक्षेशी केलेली तडजोड असून हा देशद्रोहच आहे. तरुणांच्या भवितव्याशी केंद्र सरकारने खेळ चालवलेला असून याबद्दल भाजपा सरकारने देशाची माफी मागावी. अग्निपथच्या नावाखाली कंत्राटी लष्कर भरती करण्याला काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध असून ही योजना केंद्र सरकारने मागे घ्यावी, अशी आमची मागणी आहे.

काँग्रेस पक्ष सोमवार, २७ जून रोजी सकाळी १० वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत राज्यातील सर्व विधानसभा क्षेत्रात धरणे आंदोलन करुन 'अग्निपथ' योजनेचा फोलपणा चव्हाट्यावर आणेल. या आंदोलनात पक्षाचे आमदार, खासदार, नेते, पदाधिकारी, सर्व सेल व फ्रंटचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्याने सहभागी होऊन अग्निपथ योजनेला विरोध करतील. काँग्रेस पक्ष तरुणांसोबत असून अग्निपथ योजना मागे घेईपर्यंत काँग्रेस लढा देत राहील, असेही नाना पटोले म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT