पुढारी ऑनालाईन डेस्क : महिला प्रीमियर लीग (WPL 2023) आजपासून (दि. ४) सुरू होत आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात होणार आहे. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या सामन्याच्या वेळेबाबत 'बीसीसीआय'ने नवीन अपडेट दिले आहे. उद्घाटन समारंभामुळे वेळेत बदल करण्यात आला असून, सामना साडेसात वाजता सुरू होण्याऐवजी रात्री आठ वाजता सुरू होणार आहे. नाणेफेक ७.३० वाजता होणार आहे.
'बीसीसीआय'ने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, उद्घाटनाचा सामना शनिवारी रात्री ८ वाजता सुरू होईल. नाणेफेक संध्याकाळी ७.३० वाजता होईल. मैदानाचे गेट्स प्रेक्षकांसाठी संध्याकाळी चार वाजता खुले होतील. ६.२५ ला सुरू होणाऱ्या भव्य उद्घाटन सोहळा प्रेक्षक पाहू शकतील. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात बॉलिवूड स्टार्स परफॉर्म करणार आहेत. कियारा अडवाणी आणि क्रिती सेनॉन यांसारख्या स्टार्स परफॉर्म करताना दिसणार आहेत. गायक एपी ढिल्लन सादरीकरण करणार आहे. (WPL 2023)
या स्पर्धेमध्ये एकूण २० लीग सामने आणि २ प्लेऑफ सामने खेळवले जाणार आहेत. २३ दिवसांमध्ये हे सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेत ७ देशांतील ८७ महिला क्रिकेटपटू पुढील २३ दिवस सहभागी होणार आहेत. ब्रेबॉर्न स्टेडियमवर २१ मार्च रोजी यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लीग टप्प्यातील अंतिम सामना खेळवला जाणार आहे. एलिमिनेटर सामना २४ मार्च रोजी डी.वाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. महिला प्रीमियर लीग २०२३ चा अंतिम सामना २४ मार्च रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाईल.
हेही वाचा;