कळे (कोल्हापूर); पुढारी वृत्तसेवा : धामणी खोऱ्यातील पणुत्रे (ता.पन्हाळा) येथे शेतामध्ये वैरण आणण्यासाठी गेलेल्या महिलेला गव्याने पाठीमागून धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली. मंगल मारुती पाटील (वय ६०) असे तिचे नाव असून ही घटना शनिवारी (ता.१९) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली.
अधिक माहिती अशी, मंगल पाटील या दुपारी 'वाघजाईचा नाळवा' नावाच्या शेतात वैरण आणण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी ऊसामध्ये गव्याने अचानक त्यांच्यावर पाठीमागून हल्ला करुन त्यांना शिंगावर घेतले व उचलून टाकले.अचानक बेसावध असताना गव्याने पाठीमागून केलेल्या हल्ल्यामुळे मंगल पाटील यांना जोराचा मार लागला.
यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या व बेशुद्ध पडल्या. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांचा पुतण्या विजय घटनास्थळी आला व त्यांना घरी आणले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी सीपीआरला पाठवले. पश्र्चिम पन्हाळा व धामणी खोऱ्यामध्ये गव्याने हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून वन विभागाने याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
अधिक वाचा :