Latest

Wimbledon 2023 : विम्बल्डनच्या १४६ वर्षांपूर्वीच्‍या जुन्या ड्रेस कोडमध्ये बदल

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : विम्बल्डनने १४६ वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिला टेनिसपटूंसाठी ड्रेस कोड बदलला आहे. महिला खेळाडूंना आता गडद रंगाचे अंडरशॉर्ट घालण्याची परवानगी आहे. या स्पर्धेदरम्यान ज्या महिला खेळाडूंचे पीरियड्स (मासिक पाळी)  सुरू होणार आहेत, त्यांची चिंता दूर करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

१४६ वर्षांपासून प्रतिष्ठित विम्बल्डन टेनिस स्पर्धा परंपरेने चालत आलेली आहे. या स्पर्धेमध्ये खेळाडूंनी पूर्णपणे पांढरा ड्रेस कोड परिधान करणे बंधनकारक आहे. मात्र विम्बल्डनने आता महिला खेळाडूंच्या ड्रेस कोडमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला खेळाडूंना आता गडद रंगाचे अंडरशॉर्ट किंवा अंडरपॅन्ट घालण्याची परवानगी देण्यात आली आहे.

ऑल इंग्लंड क्लबच्या सीईओ सॅली बोल्टन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, " नवीन नियम महिला खेळाडूंना एका चिंतेपासून मुक्त करेल. त्यांना त्यांच्या खेळावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करता देईल." दरम्यान, अनेक महिला खेळाडूंनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. यूएस टेनिस स्टार कोको गॉफने सांगितले की, "या निर्णयामुळे माझ्यासह लॉकर रूममधील इतर मुलींवर जो ताण असायचा तो नक्कीच कमी होईल."

ड्रेसकोडची सक्ती म्हणजे लैंगिक भेदभावाची कल्पना

रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोविच यांचे चरित्र लिहिणारे टेनिस इतिहासकार ख्रिस बोवर्स यांच्या मते, विम्बल्डनने सामाजिक दबावाखाली आपल्या नियमांमध्ये हा बदल केला आहे. एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, "विम्बल्डन अतिशय अस्वस्थ स्थितीत होते. नियमांमध्ये बदल करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. महिला खेळाडूंना त्यांच्या सोयीनुसार आणि गरजेनुसार कपडे घालण्याची परवानगी देण्याऐवजी, त्यांना विशिष्ट प्रकारचे कपडे घालण्याची सक्ती करणे म्हणजे एक पुरातन आणि लैंगिक भेदभावाची कल्पना आहे. विम्बल्डनने महिला खेळाडूंना थोडी शिथिलता दिली असेल, पण बाकीचा ड्रेस कोड पूर्वीसारखाच आहे."

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT