पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थान काँग्रेसमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. राज्यातील काँग्रेसचे नेते सचिन पालयट यांनी आपल्या पक्षाच्या सरकारविरोधात एक दिवसांचे लाक्षणिक उपोषण करणार असल्याची घोषणा आज ( दि. ९ ) केली. तसेच राज्यात काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि भाजपच्या नेत्या वसुंधरा राजे त्यांची अघोषित युती झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना पायलट म्हणाले की, काँग्रेस मागील भाजप सरकारवर भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचे आरोप करून सत्तेत आली. गेहलोत यांच्यासह मी आणि काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी जनतेला वचन दिले होते की, पूर्वीच्या भाजप सरकारवर भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांची संपूर्ण चौकशी केली जाईल.तसेच दोषींना माफ केल जाणाणर नाही, अशीही आम्ही ग्वाही दिली होती. तब्बल साडेचार वर्षे काँग्रेस सत्तेत राहूनही आजपर्यंत कसलीही चौकशी झाली नाही, हे खेदजनक आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.,
ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त मी ११ एप्रिल राेजी माझ्याच काँग्रेस सरकारविरोधात जयपूरच्या हुतात्मा स्मारकावर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहे. मागील भाजपच्या वसुंधरा राजे सरकारच्या भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांची चौकशी करण्याची माझी मागणी आहे. कारण सहा महिन्यांनी राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. माझे उपोषण एक दिवसांचे असेल. याबाबत मी प्रशासनाला कळविले आहे. मी मुख्यमंत्र्यांना पत्रे लिहिली; पण यावर कोणतीही कारवाई झाली नाही. काँग्रेस आणि भाजपमध्ये या प्रश्नी तडजोड झालेली नाही, असा संदेश जनतेला देण्याची गरज आहे, असेही पायलट यांनी यावेळी सांगितले.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या काँग्रेस सरकारने वसुंधरा राजे यांच्या मागील भाजप सरकारच्या घोटाळ्याची आणि भ्रष्टाचाराची चौकशी का केली नाही? असा सवाल पायलट या वेळी केला. यासंदर्भात मी मुख्यमंत्री गहलोत यांना दोनदा पत्र लिहिले आहे. आता निवडणुकीला ६ महिने बाकी आहेत, जनता आम्हाला हा प्रश्न विचारत आहे, हा प्रश्न काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात आहे, त्यामुळे त्याचे उत्तर देणे गरजेचे आहे.
मागील वसुंधरा सरकारवर घोटाळ्याचा आरोप करत सचिन पायलट म्हणाले की, "वसुंधरा जी यांचा कार्यकाळ सर्वात भ्रष्ट होता. काही विरोधी पक्ष काँग्रेस आणि भाजपमध्येच हातमिळवणी झाली आहे, असा प्रचार करु शकतात. या प्रश्नी मी २८मार्च २०२२ आणि २ नोव्हेंबर २०२२ रोजी सीएम गेहलोत यांना दोन स्वतंत्र पत्रे लिहून या घोटाळ्यांची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र आजपर्यंत त्यांचे उत्तर आलेले नाही."
अशोक गहलोत सत्तेत येण्यापूर्वी विरोधी पक्षात असताना माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी पत्रकार परिषदेचा व्हिडिओ जारी केला, ते म्हणाले की, गहलोत यांनी स्वतः वसुंधरा सरकारवर खान महाघोटाळा, भ्रष्टाचार, 90बी घोटाळा, खडी, खाण माफियासह अनेक घोटाळ्यांचे आरोप केले. काँग्रेसचे सरकार आल्यास तपास करून घेऊ, आरोपी तुरुंगात असतील, पण तपास होत नाही, असे गेहलोत म्हणाले होते.
राजस्थानमधील अवैध उत्खनन, खडी माफिया, दारू माफिया प्रकरणातही कारवाईची चर्चा झाली. गहलोत हे वसुंधरा सरकारवर घोटाळ्याचा आरोप करताना आणि वसुंधरा मॉडेलमधील 10 रुपयांचा हिस्सा 1 लाख रुपयांना विकल्याचा आरोप करताना दिसत आहेत. रिफायनरी प्रकल्प थांबवणे, चटई घोटाळा आदी आरोपांचाही यात समावेश होता. वसुंधरा सरकारवर तेव्हा आरोप करण्यात आले होते, पण तपास झाला नाही. गहलोत यांच्यापेक्षाही मी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष असताना आरोप केले होते. त्यामुळे जनतेसमोर कृती दाखवावी लागेल, असेही पायलट यांनी यावेळी सांगितले.
सीबीआय, ईडी, प्राप्तीकराचा गैरवापर करून केंद्र सरकारविरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करत आहे. काँग्रेस नेत्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना समन्स पाठवले जात आहेत. राजस्थानमधील आपलेच काँग्रेस सरकार आपल्या एजन्सींचा योग्य वापर आणि वापरही करत नाही. मागील भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराची चौकशी होत नाही. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि सर्वसामान्य जनतेला कळायला हवे की असे का होत आहे? असा सवालही पायलट यांनी केला.