नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : इंधन आणि ऊर्जा तसेच प्राथमिक श्रेणीतील वस्तुंचे दर घटल्याच्या पार्श्वभूमीवर सरत्या एप्रिल महिन्यात घाऊक महागाई दर (डब्ल्यूपीआय) उणे 0.92 टक्के इतका नोंदविला गेला आहे. जुलै 2020 नंतर पहिल्यांदाच हा दर नकारात्मक झाला आहे. महागाई कमी होत असल्याने आगामी काळात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल, असे मानले जात आहे.
मार्च महिन्यात खाद्यान्न श्रेणीचा निर्देशांक 2.32 टक्के इतका होता. एप्रिलमध्ये तो कमी होऊन 0.17 टक्के इतका झाला. निर्मिती श्रेणीतील वस्तुंचा महागाई निर्देशांक उणे झाला आहे. तर प्राथमिक श्रेणी आणि ऊर्जा – इंधन श्रेणीतील वस्तूंचा निर्देशांक क्रमशः 1.6 आणि 0.9 टक्क्यांपर्यंत घटला आहे. मागील काही महिन्यांतील घाऊक महागाई निर्देशांकाचे आकडे पाहिले. तर जानेवारीत हा निर्देशांक 4.73 टक्के इतका होता. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये तो क्रमशः 3.85 आणि 1.34 टक्क्यांपर्यंत कमी झाला होता. सरकारने अलिकडेच किरकोळ महागाई निर्देशांकाचे आकडे जाहीर केले होते. एप्रिलमध्ये हा निर्देशांक 4.70 टक्के इतका नोंदविला गेला होता.
हेही वाचा