Latest

कोण आहेत ॲड. गुणरत्न सदावर्ते?; वारंवार शरद पवारांना का करतात टार्गेट

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाई डेस्क : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातील काही कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. ८) राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी दगडफेक करत हल्ला केला. या हल्ल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेते ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली. या हल्ल्याचा सर्वस्तरातून निषेध होऊ लागला आणि पुन्हा एकदा प्रसारमध्यमांच्या केंद्रस्थानी ॲड. गुणरत्न सदावर्ते आले. मराठा आरक्षणाला विरोध ते एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन यामध्ये ॲड. गुणरत्ने सदावर्ते यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. तसेच या सर्वांमध्ये सदावर्ते यांनी नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वारंवार टीका केली आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या आजच्या अवस्थेला शरद पवार हेच जबादार असल्याची टीका त्यांनी अनेकवेळा केली आहे.

कोण आहेत ॲड. गुणरत्न सदावर्ते

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांची बाजू न्यायालयात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी मांडली होती. तेव्हा सदावर्ते हे प्रकाशझोतात आले होते. ॲड. जयश्री पाटील यांनी ती याचिका दाखल केली होती. ॲड. जयश्री पाटील या सदावर्ते यांच्या पत्नी आहेत. सदावर्ते यांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे आणि हे आरक्षण असंवैधानिक असल्याचे त्याचे मत आहे. मूळचे नांदेडचे असणारे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी विविध सामाजिक चळवळींमध्ये काम केले आहे. त्यांनी भारतीय राज्यघटनेवरती पीएचडी केली आहे. त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नाच्या याचिकेची बाजू न्यायालायात मांडली आहे.

एसटी कर्मचारी आंदोलनात उडी

ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी आंदोलन सुरु झाले. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी केले. पुढे या आंदोलनात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली. यानंतर आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी या आंदोलनातून काढता पाय घेतला व आंदोनाचे नेतृत्व ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे आले. सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. गुरुवारी उच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी घेत कर्मचाऱ्यांना २२ एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले. तसेच कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी, निवृत्ती वेतन देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

शरद पवार यांच्यावर टिका

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी वारंवार राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना टार्गेट केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करत असताना कर्मचाऱ्यांच्या अवस्थेला शरद पवार व महाष्ट्रात सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीला जबाबदार ठरवले आहे. पवार यांच्या राजकारणाने महाराष्ट्राची दुर्दशा केले आहे. तसेच पवार यांनी सातत्याने जातीयवादी राजकारण केल्याची टीका सदावर्ते करत आले आहेत.

शरद पवार यांच्या निवासस्थानी आंदोलकांचा हल्ला

गुरुवारी उच्च न्यायालयाचा आदेश आला. त्यावेळी ॲड. गुणरत्न सदावर्ते आणि एसटी कर्मचारी आंदोलकांनी न्यायालायच्या निर्णयाचे स्वागत करत हा आंदोलकांचा विजय असल्याचे म्हटले. आझाद मैदानावर त्यांनी या निर्णयानंतर जल्लोष सुद्धा साजरा केला. पण, शुक्रवारी अचानक एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलकांपैकी काही आंदोलक शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहचत दगडफेक केली व एक प्रकारे घरावर हल्लाच चढवला. या घटनेनतंर अवघा महाराष्ट्र आंदोलकांच्या भूमिकेने अंचबित झाला. यावेळी आंदोलकांनी शरद पवार यांना एसटी आंदोलकांच्या अवस्थेला जबाबदार असल्याची दुषणे दिली. याप्रकरणी ॲड. सदावर्ते यांनी शरद पवार यांना दोषी ठरवत टिका केली. शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी ॲड. सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी सायंकाळी ताब्यात घेतले.

एसटी आंदोलनाचा घटनाक्रम

  • मुंबईत १० नोव्हेंबर २०२१ पासून आझाद मैदानात आंदोलन सुरु
  • आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांचा १२ नोव्हेंबरला मंत्रालयावर मोर्चा
  • २१ नोव्हेंबरला आंदोलनात फुट
  • २५ नोव्हेंबरला अॅड.गुणरत्न सदावर्ते यांची आंदोलनात 'एंट्री'
  • २७ नोव्हेंबरला आंदोलनात अॅड.सदावर्ते यांच्या हाती आंदोलन
  • ०२ डिसेंबरला एसटी विलिनीकरणावर अहवालावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व महाविकास आघाडीवर टीका
  • २१ डिसेंबरला कनिष्ठ वेतन श्रेणी संघटनेची माघार; आंदोलनात फुट, याचदिवशी दुपारी अॅड.सदावर्ते यांची शरद पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका
  • २२ डिसेंबर २०२१ ला आंदोलन सुरु ठेवण्याचे अॅड.सदावर्ते यांचे आझाद मैदानात आवाहन
  • २२ मार्च २०२२ ला तुम्ही मला साथ दया, मी तुम्हाला विलिनीकरण देतो, अॅड.सदावर्ते यांची आंदोलनकर्त्यांना साद. एसटी कर्मचाऱ्यांचे वाटोळे केले अशी टीका शरद पवार यांच्यावर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी केली.
  • ०७ एप्रिल २०२२ : न्यायालायाचा आदेश हा कष्टकऱ्यांचा विजय आहे. तुम्हाला न्यायालयाने चपराक दिली आहे, अशी टिका अॅड.सदावर्ते यांनी शरद पवार यांच्यावर केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT