पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणार्या दोघांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून एक कोटी 10 लाख रुपये किंमत असलेली उलटी जप्त करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सोमवारी (दि. 6) मोशी टोल नाका येथे ही कारवाई केली.
जॉन सुनील साठे (33, रा. मगरमळा, नाशिक रोड), अजित हुकूमचंद बागमार (61, रा. कारंजा नाशिक), मनोज अली (रा. भिवंडी नाशिकफाटा पिंजारवाडी) यांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील जॉन आणि अजित या दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई प्रमोद गर्जे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजित आणि मनोज या दोघांनी आरोपी जॉन याला कुरियरने व्हेल माशाची उलटी पाठवली. आरोपी जॉन हा पिंपरी चिंचवड शहरात या उलटीची बेकायदेशीर विक्री करणार होता.
याबाबत गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार, त्यांनी मोशी येथील टोलनाका परिसरात सापळा रचून आरोपी जॉन याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून पोलिसांनी तब्बल एक कोटी 10 लाख रुपये किंमत असलेली व्हेल माशाची 550 ग्रॅम वजनाची उलटी जप्त केली आहे. पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील तपास करीत आहेत.
व्हेल माशाच्या उलटीचा वापर परफ्यूम तयार करण्यासाठी होतो. त्याचा सुगंध दीर्घकाळ टिकतो. त्यामुळे या व्हेल माशाच्या उलटीचे प्रकार पुढे येऊ लागले आहेत, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. अशी माहिती पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिली.