शिरूर(ता.शिरूर); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-दुमाला येथील प्राचीन सोमेश्वर मंदिराला नुकतीच अमेरिका येथील कॅरिलोना प्रांतातील पुरातत्त्व व लेणी अभ्यासक डेविड एफर्ड यांनी भेट दिली व मंदिरातील मूर्तींचे निरीक्षण केले. येथील सोमेश्वर महादेवाचे मंदिर फार प्राचीन आहे. मंदिरावर वेगवेगळे आशय असणारी तब्बल शंभर शिल्पे कोरण्यात आली आहेत.
यामध्ये शिव, विष्णू, चामुंडा, गणेश, नाथ-योगी, सुरसुंदरी यांच्या शिल्पांचा समावेश होतो. मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ व हठयोगाशी संबंधित शिल्पे दुर्मीळ प्रकारातील आहेत. पिंपरी-दुमाला येथील हे शिल्प वैभव पाहण्यासाठी जिल्ह्यातून तसेच बाहेरून अनेक भक्त-भाविक, पर्यटक, संशोधक येत असतात. पिंपरी दुमाला गावाचे नाव आता विदेशातही पोहोचले आहे.
सोमेश्वर मंदिर हे कला-स्थापत्याचे एक उत्तम उदाहरण असल्याचे एफर्ड यांनी आवर्जून सांगितले. या मंदिराचे संगोपन व संवर्धन व्हावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे पिंपरी दुमाला येथील मंदिराला भेट देणारे ते पहिले विदेशी संशोधक आहेत, त्यांच्या सोबत नाथ संप्रदायाचे अभ्यासक डॉ. विजय सरडे व डेक्कन कॉलेज, पुणे येथील माजी लेणी अभ्यासक डॉ. श्रीकांत जाधव हेदेखील उपस्थित होते.
डॉ. सरडे यांनी सोमेश्वर मंदिरावरील शिल्पे गावकर्यांना समजावून सांगितली, तर डॉ. जाधव यांनी मंदिरावरील रंग काढून त्याचे संगोपन कसे करता येईल, याविषयी मार्गदर्शन केले. ग्रामस्थांच्या वतीने मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या वेळी माजी आदर्श सरपंच गायत्री चिखले, देवस्थान ट्रस्ट बांधकाम समितिचे अध्यक्ष सर्जेराव चिखले, माजी उपसरपंच अशोक दुर्गे, माजी संचालक दादाभाऊ शेळके, सोमेश्वर जीर्णोद्धार समितीचे संचालक शेखर पाटेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम चालू असून, भाविकांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन ही ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले.
हेही वाचा