लंडन : ब्रिटनमध्ये राहणारी 32 वर्षीय निकोला हॉजेस एकेदिवशी अचानक कोमात गेली. तिच्या मिरगीच्या (अपस्मार) औषधात बदल केल्यामुळे तिची प्रकृती अचानक बिघडली. तिला तातडीने अॅशफोर्ड येथील विल्यम हार्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की, तिच्या वाचण्याची शक्यता केवळ 20 टक्के आहे आणि जरी ती जागी झाली, तरी ती पूर्वीसारखी सामान्य जीवन जगू शकणार नाही. मात्र, ती कोमामधून बाहेर आली आणि या स्थितीत असताना आलेल्या अनोख्या अनुभवाबाबत तिने सांगितले.
निकोला सांगते की, कोमातील तिचा अनुभव चित्रपट किंवा कथांमध्ये दाखवल्यासारखा अजिबात नव्हता. तिला कोणतेही पांढरे शुभ्र दरवाजे किंवा चमकदार द़ृश्ये दिसली नाहीत. त्याऐवजी, तिला फक्त एक उबदारपणा जाणवला आणि तिच्या सभोवताली एक सोनेरी-पिवळ्या रंगाचा (रालशी) प्रकाश होता. याच अनुभवामुळे तिला वाटू लागले की, कदाचित मृत्यूनंतरही एखादी ऊर्जा किंवा जीवन अस्तित्वात असते.
कोमातून बाहेर आल्यानंतर निकोलाचे आयुष्य पूर्वीसारखे राहिले नाही. तिला गोष्टी लक्षात राहत नव्हत्या, संभाषणात भाग घेणे कठीण झाले होते आणि ती लवकर थकून जात होती. एकदा झटक्यादरम्यान पडल्यामुळे तिच्या डोक्यात चार ठिकाणी रक्तस्राव (ब्रेन हॅमरेज) झाला. यानंतर मायग्रेन, सेन्सरी ओव्हरलोड (संवेदनांचा अतिरेक) आणि वारंवार येणारे झटके तिच्या आयुष्याचा एक भाग बनले.
कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये तिला अनेकदा आपण हरवल्यासारखे वाटायचे आणि तिला संभाषण समजत नसे. अशावेळी, ती मुलांसोबत बसून गप्पा मारायची, ज्यामुळे तिला आराम आणि शांतता वाटायची.