Potato Evolved from Wild Tomato
लंडन : आपल्या सर्वांच्या आवडत्या आणि रोजच्या आहारातील महत्त्वाचा घटक असलेल्या बटाट्याचा उगम सुमारे 80 ते 90 लाख वर्षांपूर्वी जंगली टोमॅटो आणि बटाट्यासारख्या दिसणार्या वनस्पतींमध्ये झालेल्या एका नैसर्गिक आंतरप्रजननाच्या (random mating) घटनेतून झाला असावा, असे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे.
आज आपण खात असलेला बटाटा ( Solanum tuberosum) आणि त्याच्या 107 जंगली प्रजाती ‘पेटोटा’ या कुळात मोडतात. नवीन संशोधनानुसार, हे कूळ इतर दोन कुळांच्या पूर्वजांच्या आंतरप्रजननामधून उदयास आले आहे. यातील पहिले कूळ म्हणजे ‘टोमॅटो’, ज्यात आपल्या सॅलडचा अविभाज्य भाग असलेल्या Solanum lycopersicum 17 जिवंत प्रजाती आहेत. तर दुसरे कूळ म्हणजे ‘इट्युबेरोसम’ (Etuberosum), ज्याच्या तीन प्रजाती दक्षिण अमेरिकेत आढळतात.
लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियममधील वनस्पतिशास्त्रज्ञ आणि या अभ्यासाच्या सहलेखिका सँड्रा नॅप यांनी सांगितले, ‘उत्क्रांतीच्या द़ृष्टिकोनातून, टोमॅटो, पेटोटा आणि इट्युबेरोसम या कुळांमधील संबंधांबद्दल एक न सुटलेला वैज्ञानिक मतभेद होता.’ नॅप यांच्या मते, या आंतरप्रजननाचे महत्त्व हे आहे की, यामुळे पेटोटा कुळामध्ये जनुकांचे नवीन संयोजन तयार झाले, ज्यामुळे ‘कंद’ (tubers) विकसित झाले. कंद म्हणजे जमिनीखाली वाढणारे फुगीर अवयव, जे पाणी आणि पोषक तत्त्वे साठवतात आणि ज्याचा आपण अन्न म्हणून वापर करतो. विशेष म्हणजे, आधुनिक टोमॅटो आणि इट्युबेरोसम वनस्पतींच्या पूर्वजांमध्ये कंद नव्हते आणि संकरानंतरही त्यांच्या मूळ कुळात कंद विकसित झाले नाहीत.
‘आमचे निष्कर्ष दाखवतात की, प्रजातींमधील संकराची घटना कशी नवीन गुणधर्मांच्या उत्क्रांतीला चालना देऊ शकते, ज्यामुळे आणखी नवीन प्रजाती उदयास येतात,’ असे या अभ्यासाचे सहलेखक आणि चायनीज अॅकॅडमी ऑफ अॅग्रीकल्चरल सायन्सेसचे प्राध्यापक सॅनवेन हुआंग यांनी एका निवेदनात म्हटले आहे. ‘आम्ही अखेर बटाटा कुठून आला, याचे रहस्य उलगडले आहे.’ या कुळांमधील उत्क्रांतीचे संबंध स्पष्ट करण्यासाठी संशोधकांनी पेटोटा, टोमॅटो आणि इट्युबेरोसम वनस्पतींच्या 128 जीनोमचे विश्लेषण केले. यासाठी त्यांनी अत्याधुनिक जनुकीय साधनांचा वापर केला, जी पूर्वी उपलब्ध नव्हती. यामुळेच हे निष्कर्ष मिळवण्यासाठी इतका वेळ लागला, असे नॅप यांनी स्पष्ट केले. या टीमने आपले संशोधन ‘सेल’ या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रकाशित केले आहे.