

चिपळूण : समीर जाधव
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समाजापुढे जावा, पिढ्यान्पिढ्या, शतकानुशतके लोकांना राष्ट्रभक्तीचे पाठ मिळावेत यासाठी मुंबई-गोवा महामार्गालगत रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डेनजीक डेरवण येथे शिवसृष्टी निर्माण झाली. श्री छत्रपती शिवाजी महाराज व श्री शंभू महादेवाच्या अवतारांचे स्मारक शिवसमर्थ गडावर उभारण्यात आले आहे. आज कोकणात येणारा पर्यटक डेरवण येथील शिवसमर्थ गडाला भेट देतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख करून घेतो.
5 मे 1981 रोजी डेरवण येेथे शिवजयंतीच्या दिवशी शिवसमर्थ गडाचे उद्घाटन झाले आणि त्यानंतर एक-एक मावळा, एक-एक घोडेस्वार उभा राहात गेला, तटबंदी तयार झाली. श्री सद्गुरू सहजानंद सरस्वती महाराजनिर्मित श्री शिवसमर्थ गड आणि श्री शिवसमर्थ मंदिर उभे राहिले. या शिवसमर्थ गडाचे वैशिष्ट्य म्हणजे शिल्पकार कै. दादा पाटकर आणि त्यांच्या सहकार्यांनी श्री महाराजांच्या कल्पनेला येथे शिल्परूप दिले. शिवाजी महाराजांच्या जीवनावरील विविध रंगांतील भिंतीशिल्प पाहून डोळ्यांचे पारणे फिटतात.
येथे द़ृकश्राव्याच्या माध्यमातून प्रत्येक प्रसंगांचा इतिहास पर्यटकांना जाणून घेता येतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, त्यांचे बारसे, शिक्षण, स्वराज्याची शपथ, महाराजांच्या काळातील लढाया, पावनखिंडीतील लढाई, शाहिस्तेखानाची बोटे छाटली, अफजल खानाचा वध, राज्याभिषेक असे अनेक प्रसंग भिंतीमध्ये हुबेहूब चितारण्यात आले आहेत.
येथील मंदिरात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आहे. संत तुकाराम, संत रामदास, संत नामदेव, तसेच गोमातेचे मंदिर आहे. पायदळातील शिपाई, घोडेस्वार, बुरूज, टेहळणी करणारे शिपाई, पहारेकरी यांचा गराडा येथे पाहायला मिळतो आणि आपण शिवकालात गेल्याचा भास होतो. नेताजी पालकर यांचा इतिहास, सुरतेवरची स्वारी असे अनेक प्रसंग उभे केले आहेत. ते पाहताना शिवकाळ समोर येतो.
शिवसमर्थ गडाच्या प्रवेशद्वारावर दुतर्फा दोन मोठे हत्ती आणि त्यावर स्वागत करणारे पहारेकरी आहेत. एखाद्या किल्ल्यात प्रवेश करावा, असा तेथे भास होतो. शिवसमर्थ गड पाहिल्यानंतर आत प्रवेश केल्यावर श्री संत सीतारामबुवा वालावलकर यांचे समाधी मंदिर दिसते, त्याच्या शेजारी श्री स्वामी समर्थ व श्रीराम मंदिर आहे. तसेच श्री स्वामी समर्थ आणि श्री सद्गुरू सहजानंद सरस्वती महाराज यांच्या पंचधातूच्या मूर्ती आहेत.
डेरवण शिवसृष्टी पाहण्यासाठी आणि डेरवण ट्रस्टचा कारभार पाहण्यासाठी जायचे असेल, तर रेल्वे, रस्ते मार्गाने जाता येते. मुंबईहून रेल्वेने चिपळूण अथवा सावर्डे रेल्वे स्थानकात उतरता येते. तेथून डेरवणला जाता येते. मुंबई-गोवा महामार्गावरून सावर्डे-दुर्गेवाडी फाट्यामार्गे डेरवणकडे एसटी, खासगी बस, रिक्षाने जाता येते.