

Vengurla Dutch Vakhar
सिंधुदुर्ग : नागेश पाटील
छत्रपती शिवाजी महाराजांनी र्निमिलेल्या स्वराज्यासाठी महत्त्वाचे योगदान देणा-या वेंगुर्लेतील डचकालीन डच वखार (वेंगुर्ला कोट) या भुईकोट किल्ल्याचा इतिहास ४०० वर्ष जुना आहे. भारतात व्यापार व दळणवळणाच्या दृष्टीने आलेल्या डचांनी या किल्ल्याची निर्मिती 1637 साली केली. भारतात व्यापार उदीम वाढवण्याच्या दृष्टीने डचांनी पहिले पाउल हे वेंगुर्लेमध्ये टाकले. परदेशातून आणलेला माल उतरवून तो सुरक्षित ठेवण्यासाठी एका वखारीची (गोदाम) गरज होती. त्यामुळे डचांनी वेंगुर्ला, सावंतवाडी, बांदा हा भूभाग ताब्यात असलेला विजापूरचा बादशहा आदिलशहाकडे वखार बांधण्यासाठी परवानगी मागितली आणि ती त्यांना मिळाली. (Sindhudurg News)
त्यानंतर डचांनी या वेंगुर्ला कोटाची उभारणी केली. तीन मजली असलेल्या या वखारीची इमारत भलीमोठी आहे, तर कच्चा माल ठेवण्यासाठी मोठया प्रमाणात खोल्या उभारण्यात आलेल्या आहेत. त्या काळी नालासोपारा, विजयदुर्ग, वेंगुर्ला ही तीनच बंदरे अस्तित्वात होती. वेंगुर्ला बंदर असल्यामुळे समुद्रामार्गे जवळपास सत्तर देशातून जहाजामध्ये माल भरुन हा माल वेंगुर्ला कोट (वखार) येथे आणून जमा केला जात होता. भारतात डच हे व्यापार आणि व्यवसाय वाढविण्याचा हेतू ठेवून आले होते. सुरत हे त्या काळी भारतातील व्यापाराचे प्रमुख केंद्र होते. त्यानंतर वेंगुर्ला येथे वखारीची उभारणी करुन त्यांनी आपला व्यवसाय महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या तीन राज्यांमध्ये पसरवला. आपल्या व्यापार व दळणवळणामधून मोठया प्रमाणावर डचांनी आर्थिक उलाढाल केली. मात्र त्यांना या भागात सुरक्षेची खात्री नसल्याने त्यांनी दक्षिण कोकण प्रदेश ताब्यात असलेल्या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांशी संधान साधले. आपणास सुरक्षा पुरविण्यात यावी त्याच्या बदल्यात नजराणा देण्याचे ठराव डचांनी महाराजांकडे केले. त्यानुसार त्यांचा व्यापार वाढविण्यासाठी डचांना महाराजांनी सुरक्षा पुरविली. सन 1641 मध्ये चार वर्षांनंतर डच वखार काही ठिकाणी पडली. त्यामुळे या वखारीची पुन्हा निर्मिती करावी लागली. 16 मे 1663 साली छत्रपती शिवाजी महाराज यांनी डच वखारीला (वेंगुर्ला कोट) भेट दिल्याची नोंद आहे. तर डच अधिकारी कोणतीही समस्या असल्यास ती सोडविण्यासाठी रायगडावरही जात असत.
स्वराज्यासाठी या वखारीचे मोठे योगदान राहिले आहे. त्याकाळी वेगवेगळया देशांबरोबरच अरब राष्ट्रातील व्यापारी देखील मोठया प्रमाणावर या ठिकाणी आपला माल घेवून उतरत असत. तर छत्रपती संभाजी महाराज यांना कैद करण्यासाठी दिल्लीचा बादशहा औरंगजेब याचा मुलगा हा याच डच वखारीमध्ये येवून राहिला होता, असे इतिहासात नमूद आहे. वारंवार अरब देशातून व्यापारी इथे येत असल्यामुळे या वखारीमध्ये त्यांना नमाज पढण्यासाठी मशीदही त्या काळी बांधण्यात आली होती. ती आजही आहे. महाराजांच्या शिवचरीत्रामध्ये या वेंगुर्ले कोट (डच वखार) चा उल्लेख आढळतो. काही काळ या डच वखारीचा ताबा सावंतवाडीच्या सावंत भोंसले यांच्याकडेही होता, तर या भुईकोट किल्ल्यासाठी पेशवे, करवीरकर, पोर्तुगीज, सावंतवाडीचे सावंत-भोंसले, इंग्रज यांच्यामध्ये युध्देही झाली होती.
आता वेंगुर्ल्यातील डच वखार या भुईकोट किल्ल्याची बरीच पडझड झाली आहे. वरील दोन मजले पूर्णतः मोडकळीस आले आहेत, तर तळभागातील मजला शाबीत आहे. या किल्ल्याच्या पुर्नउभारणीसाठी व डागडुजीकरीता केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाकडून दोन कोटी चाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यानुसार वखारीच्या दुरुस्तीला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. या वखारीबद्दल आंतरराष्ट्रीय इतिहासकार, अभ्यासक, संशोधक, किल्लेप्रेमी यांना कुतुहल असून ते आवर्जून भेट देत असतात. डच वखारीच्या संवर्धनासाठी इतिहास संशोधक, किल्लेप्रेमी व अभ्यासक वेंगुर्लेचे रहिवासी डॉ. संजीव लिंगवत गेली कित्येक वर्षे प्रयत्न करीत आहेत.
वेंगुर्ल्यातील डच वखारीचा छत्रपती शिवाजी महाराजांशी अगदी जवळचा संबंध आहे. स्वराज्याच्या उभारणीमध्ये या वखारीने बहुमोल, असे योगदान दिले आहे. डच अधिकारी आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय त्या काळी घेण्यात आल्यामुळे दक्षिण कोकण द्विग्विजय मोहिमेमुळे कोकणात उतरलेल्या छत्रपतींनी या वखारीला 16 एप्रिल 1663 साली भेट दिली. त्यावेळी कुडाळच्या भुईकोट किल्ला येथेही महाराजांनी भेट दिली होती. सुरक्षा पुरविण्याच्या बदल्यात त्याकाळी मोठया प्रमाणावर महाराजांना डच अधिकारी यांच्याकडून नजराणे दिले जायचे. हे नजराणे स्वराज्याच्या निर्मितीसाठी तसेच सुरक्षेसाठी उपयोगात आणले जात होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही डचांच्या निर्मिलेल्या वेंगुर्ला कोट वखार या किल्ल्यावर हल्ला केला नाही. उलट परकीय आक्रमणांपासून रक्षणच केले. शेजारच्या गोवा राज्यात पोर्तुगिजांचे प्रमुख व्यापारी केंद्र होते. त्यामुळे पोर्तुगीजांना शह देण्यासाठी महाराजांनी डचांना बरीच मदत केली. छत्रपतींनी सुरत लुटण्याची योजना आखली होती, ही माहिती डचांना समजली असता, त्यांनी सुरतमधील बराचसा मुद्देमाल घाबरुन समुद्रामार्गे याच डच वखारीमध्ये आणून ठेवला होता. त्यानंतर डच आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामधील संबंध बिघडले. मात्र कालांतराने ते पुन्हा सुरळीत झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवकालीन नाणी तयार करण्याकरीता याच डच अधिका-यांकडून 7 जहाज ब्राँझ व पितळ धातू घेतले होते. डच अधिकारी यांनी त्यांना शिवमुद्रा तयार करण्यासाठी हे धातू दिल्याची नोंद इतिहासात आहे. (Sindhudurg News)
सुरत नंतर डच यांना आपला व्यापार वाढवायचा होता. त्याकाळी नालासोपारा, विजयदुर्ग, वेंगुर्ला, अशी तीनच बंदरे अस्तित्तवात असल्यामुळे त्यांनी वेंगुर्ला बंदर येथे जवळच दिड किमी. अंतरावर वखार उभारण्याचा निर्णय घेतला. वेंगुर्ला बंदरपासून अगदी जवळच हा वेंगुर्ला कोट आहे. त्यामुळे बंदरावर मालाची ने-आण करणे सुलभ होवू लागले. जवळपास सत्तर देशांतून या वखारीमध्ये माल आणून भरला जात होता. तर अरब देशातूनही कित्येक अरबी व्यापारी या ठिकाणी माल आणून पोहोचवत असत. या सर्व बाबींमुळे वेंगुर्ला हे व्यापाराचे केंद्र बनले. डच याच वखारीच्या मदतीने महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यात आपला माल पोहोचवत. त्यासाठी त्या काळी वेंगुर्ला-विजापूर हा रस्ता तयार करण्यात आला होता. त्याचे पुरावे आजही आहेत. पोर्तुगीज, इंग्रज यांनी वखार लुटण्याचा प्रयत्न केला, मात्र ती त्यांना ताब्यात घेता आली नाही. त्यावेळी वखारीचे महत्त्व मोठे असल्याने शिवाय महाराजांचे त्याला सहकार्य मिळाल्यामुळे व्यापार व दळणवळण वाढविण्यासाठी या भुईकोट किल्ल्याचा बराच उपयोग झाला.
वेंगुर्ला वखार डचांनी 1637 साली उभारणी करण्यास सुरुवात केली. त्याच काम 1641 साली पूर्ण झाले. ही वखार बांधण्यासाठी विजापूरचा आदिलशहा याच्याकडे डच अधिकारी व्हॅन ट्वीक याने परवानगी मागितली होती. त्यावेळी कोकणातील काही भाग आदिलशाहाच्या ताब्यात होता. त्यामुळे त्याची परवानगी घेवूनच वखार बांधण्यात आली. या वखारीसाठी पूर्णतः चि-यांचा वापर करण्यात आला आहे. गोवा राज्यात पोर्तुगीज तेथील बंदरातून व्यापार करत होते. त्यामुळे डच यांनी वेंगुर्ला येथे वखार बांधून व्यापार सुरु केला. चार वर्षानंतर वखार काही प्रमाणात ढासळली, त्यामुळे पुन्हा ती बांधण्यात आली.
वेंगुर्ल्यातील ऐतिहासिक डच वखार वजा किल्ल्याकडे जाण्यासाठी बेळगाव, कोल्हापूर मधून जवळचे मार्ग आहेत. सावंतवाडी शहरापासून 28 कि.मी अंतरावर ही वखार आहे. शहराच्या मधोमध बाजारपेठेला लागूनच 1 कि.मी अंतरावर भलीमोठी अशी ही डच वखार आहे. गोवा राज्यातूनही या वखारीकडे येण्यास बरेच मार्ग उपलब्ध आहेत. (Sindhudurg News)