एक कोटीची लॉटरी लागली; पण तिकिटाचा मालक सापडेना! (Pudhari File)
विश्वसंचार

Lottery Winner Missing | एक कोटीची लॉटरी लागली; पण तिकिटाचा मालक सापडेना!

नशिबात असेल तर एखाद्याला इतकी संपत्ती मिळते की, तिला ‘छप्पर फाडके बरसात’ म्हटले जाते.

पुढारी वृत्तसेवा

लुधियाना : नशिबात असेल तर एखाद्याला इतकी संपत्ती मिळते की, तिला ‘छप्पर फाडके बरसात’ म्हटले जाते. अनेकजण लॉटरीचे तिकीट काढून आपले नशीब आजमावत असतात. अशाच एकाला लॉटरीच्या सोडतीत तब्बल एक कोटीचे बक्षीस लागले; परंतु या लॉटरी तिकिटाचा मालक काही ही बक्षिसाची रक्कम घ्यायला आला नाही. त्यामुळे मोठी पंचाईत झाली आहे. या लॉटरीच्या विजेत्याचा शोध घेण्यासाठी गावागावांत ढोल वाजवून दवंडी पिटण्यात येत आहे. पंजाबच्या लुधियाना शहरात एक कोटीची लॉटरी जिंकलेल्या या अज्ञात विजेत्याची शोध घेतला जात आहे.

सध्या या विजेत्याच्या शोधासाठी खास मोहीम राबविली जात आहे. ओमकार लॉटरी नावाच्या लॉटरी दुकानाचे मालक ढोल वाजवून या भाग्यशाली विजेत्याचा शोध घेत आहेत. या विजेत्याने सुमारे दोन हजार रुपयांचे तिकीट विकत घेतले होते आणि या व्यक्तीच्या लॉटरी तिकिटाचा क्रमांक 7565 ला एक कोटीचे बक्षीस लागले आहे. परंतु, हा विजेता बक्षीस घेण्यास आलेला नाही. दुकानाचे मालकाने दिलेल्या माहितीनुसार तिकीट खरेदी करणार्‍या व्यक्तीने त्याचे नाव आणि मोबाईल क्रमांक नोंदवण्यास मनाई केली होती. यामुळे त्याची ओळख पटवणे कठीण बनले आहे. लॉटरी कंपनीच्या वतीने शहरात जागोजागी दवंडी पिटवली जात आहे. त्यामुळे ही बातमी त्या भाग्यवान विजेत्यापर्यंत पोहोचावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

ज्याच्याजवळ 7565 क्रमांकाचे लॉटरीचे तिकीट आहे, त्याने विजयाची रक्कम घेऊन जावी, असे म्हटले जात आहे. लॉटरी विक्रेत्याने सांगितले की, या विजेत्या तिकिटाची सोडत होऊन काही आठवडे झाले आहेत. नियमानुसार तिकिटाच्या बक्षिसावर दावा करण्यासाठी केवळ एक महिन्याची मुदत असते. जर या काळात तिकीट विजेता आला नाही तर इनामाची रक्कम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. कोणा अन्य व्यक्तीला ही रक्कम मिळणार नाही.

लॉटरी दुकानाच्या मालकाने म्हटले आहे की, ही पहिलीच वेळ नाही की या दुकानातून विक्री झालेल्या तिकिटावर बक्षीस लागले आहे. याच्या आधीही आपण विकलेल्या तिकिटांवर 20 लाख आणि 50 लाखांचे बक्षीस लागले आहे, असे दुकानाच्या मालकाने म्हटले आहे. आता जर येत्या काही दिवसांत विजेता सापडला नाही, तर हे इनाम त्याच्या काहीही उपयोगाचे नाही. लुधियानातील लोकांनाही देखील या भाग्यवान लॉटरी तिकीट विजेत्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. अखेर एक कोटी रक्कम कोणाला मिळणार, याचे औत्सुक्य कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT