

टोकियो : जगभरात वेगवेगळ्या प्रकारचे अन्न खाल्ले जाते. काही ठिकाणचे पदार्थ पाहून तर आपण थक्क होऊन जातो. चीनसारख्या देशात तर साप, बेडूकही खाल्ला जातो. मात्र, या जगात काही पदार्थ असे आहेत, ज्यात विष असते. म्हणजेच हे पदार्थ खाताना तुम्ही चूक केली तर तुमचा कदाचित जीवही जाऊ शकतो, असे सांगितले जाते. जगात असाच एक सर्वात विषारी पदार्थ आहे. हा पदार्थ काही मोजकेच लोक तयार करू शकतात. या पदार्थाला योग्य पद्धतीने तयार न केल्यास पुढच्याच काही मिनिटात व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. कॅनडामधील इन्स्टिट्यूट ऑफ फूड सेफ्टीच्या रिपोर्टनुसार जपानमध्ये फुगू नावाचा एक मासा आहे. या माशापासून बनवलेला खाद्यपदार्थ सर्वाधिक विषारी मानला जातो.
या फुगू माशाला ‘पफरफिश’ही म्हटले जाते. या माशामध्ये टेट्रोडोटॉक्सिन नावाचा घटक आढळतो. फुगू या माशाचे अंडाशय, आतडे, फुफ्फुस यामध्ये टेट्रोडोटॉक्सिन हा घटक सर्वाधिक आढळतो. टेट्रोडोटॉक्सिन हा घटक न्युरोटॉक्झिन आहे. हा घटक सायनाईडपेक्षाही विषारी असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच एका फुगू माशामुळे तब्बल 30 लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असे म्हटले जाते. फुगू हा मासा विषारी असला तरीदेखील जपानमध्ये त्याचा आहारात समावेश केला जातो. मात्र, या माशापासून प्रत्येकालाच खाद्यपदार्थ तयार करता येत नाहीत. त्यासाठी जपानी शेफला ट्रेनिंग दिले जाते.
जपानमधील अनेक रेस्टॉरंटस्मध्ये फुगू डिश दिले जाते. मात्र, हे डिश तयार करण्याची परवानगी फक्त कुशल व परवानाधारक शेफनाच असते. फुगू डिशला योग्य पद्धतीने न तयार केल्यास ते खाणार्याचा मृत्यूदेखील होऊ शकतो. चुकीच्या पद्धतीने बनवलेल्या फुगू डिशमुळे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. दरम्यान, या फुगू डिशची किंमतही खूपच जास्त असते. या एका फुगू डिशची किंमत 3500 ते 20000 हजार रुपये असते. अनुभवी शेफच्या मदतीनेच हे डिश तयार केले जाते, त्यामुळेच त्याची किंमत जास्त असते. जपानमध्ये काही प्रीमियम रेस्टॉरंटस्मध्ये फुगू डिशची किंमत 35 हजार रुपयांच्या घरात आहे. फुगू डिश अत्यंत स्वादिष्ट असते, त्यामुळेच अनेक लोक हे डिश खाणे धोका पत्करूनही पसंद करतात!