स्पेससूटमधील कुलिंग अम्बिलिकल युनिटमधून पाणीगळती सुरू झाल्यामुळं ही मोहीम रद्द.  Pudhari File Photo
विश्वसंचार

सुनीता आणि सहकार्‍यांसमोर नवे आव्हान!

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अंतराळ क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी आणि महत्त्वाची संशोधने करण्यासाठी ओळखल्या जाणार्‍या ‘नासा’ कडून एक नवा व्हिडीओ नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. ‘एक्स’ माध्यमातून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकारी अंतराळवीरांपुढं उभ्या राहिलेल्या आव्हानांची माहिती देण्यात आली आहे.

पाणी गळतीने स्पेस वॉक झाला रद्द

विल्यम्स आणि त्यांच्या सहकार्‍यांनी अंतराळात स्पेस वॉक करण्याचं ठरवलेलं असतानाच उद्भवलेल्या एका अडचणीमुळं त्यांना ही मोहीम आयत्या वेळी रद्द करावी लागली. अंतराळवीर ट्रेसी सी. डायसनच्या स्पेससूटमधील कुलिंग अम्बिलिकल युनिटमधून पाणीगळती सुरू झाल्यामुळं ही मोहीम रद्द करण्यात आली. यावेळी या टीमनं थेट अवकाशातूनच थेट द़ृश्यही जगासमोर आणली. दरम्यान, सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी गेल्या काही दिवसांपासून एका मोठ्या अडचणीमुळे चर्चेचा विषय ठरले आहेत. 5 जून रोजी अवकाशवारीवर गेलेल्या विल्यम्स 13 जून रोजी अवकाशातून पृथ्वीवर परतणं अपेक्षित होते, त्या अद्याप पृथ्वीवर पोहोचू शकल्या नाहीत. विल्यम्स यांच्या बोईंग स्टारलायनरमध्ये हेलियम लीक झाल्यामुळे त्यांच्या परतीच्या प्रवासात व्यत्यय येत असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, ही मोहीम सुरू होण्याआधीच ‘नासा’ आणि बोईंगना यासंदर्भातील कल्पना असल्याचे सांगितले जात आहे, पण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये या गोष्टीकडे किरकोळ बिघाड म्हणून पाहिल्याने आता ही अडचण ओढावल्याचे सांगितले जात आहे.

परतीसाठी 26 दिवसच शिल्लक

बोईंगच्या स्टारलायनर प्रोग्राम मॅनेजर मार्क नप्पी यांच्या माहितीनुसार स्पेसक्राफ्टमधील हेलियम प्रणाली ज्या पद्धतीने तयार करण्यात आली होती ती अपेक्षितरित्या काम करत नाही. परिणामी सध्याच्या घडीला विल्यम्स आणि त्यांच्यासमवेत असणार्‍या अंतराळयात्रींना सुखरूप पृथ्वीवर परत आणण्यासाठीच नासाचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, उपलब्ध माहितीनुसार स्टारलायनरची इंधनक्षमता 45 दिवसांची असून, ही मोहीम साधारण 18 दिवसांपूर्वी सुरू झाली होती. आता या मोहिमेत 26-27 दिवसच शिल्लक असल्यामुळे बुच विल्मोर आणि सुनीता विलियम्स यांच्या परतीच्या प्रयत्नांना आणखी वेग मिळाला आहे. सर्व अडचणी दूर झाल्यानंतर जेव्हा स्पेसक्राफ्ट पृथ्वीवर परतण्यासाठी पूरक परिस्थिती निर्माण केली जाईल, तेव्हाच हे अंतराळवीर पृथ्वीवर परतू शकणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT