Healthy Diet | योग्य आहारामुळे मेंदूचे वय वाढण्याचा वेग २.५ वर्षांनी कमी होतो 
विश्वसंचार

Healthy Diet | योग्य आहारामुळे मेंदूचे वय वाढण्याचा वेग २.५ वर्षांनी कमी होतो

पुढारी वृत्तसेवा

आपण जे खातो त्याचा परिणाम केवळ आपल्या वजनावर किंवा हृदयाच्या आरोग्यावरच होत नाही, तर तो आपल्या मेंदूच्या वृद्धत्वाचा (एजिंग) वेग ठरवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतो, अशी माहिती एका नवीन संशोधनातून समोर आली आहे. ‘जर्नल ऑफ न्यूरॉलॉजी, न्यूरोसर्जरी अँड सायकियाट्री'मध्ये प्रकाशित झालेल्या एका मोठ्या दीर्घकालीन अभ्यासानुसार, ‘माईंड डाएट’चे काटेकोरपणे पालन करणाऱ्या लोकांमध्ये मेंदूचा ऱ्हास होण्याचा वेग कमी झाला असून, त्यांचे मेंदूचे वय इतर लोकांच्या तुलनेत सुमारे २.५ वर्षे तरुण राहिल्याचे दिसून आले आहे.

काय आहे ‘माईंड डाएट’?

हा आहार ‘मेडिटेरेनियन डाएट’ आणि ‘डॅश डाएट’ या दोन प्रसिद्ध आहार पद्धतींचे मिश्रण आहे. (याला मेडिटेरियन-डॅश इंटरव्हेंशन फॉर न्यूरोडिएजेनेरेटिव्ह डिलेे म्‍हणतात). यामध्ये मेंदूच्या आरोग्याला फायदेशीर ठरणारे अन्नपदार्थ जसे की, हिरव्या पालेभाज्या, बेरीज (लहान फळ), नटस्‌ (सुकामेवा) आणि मासे खाण्यावर भर दिला जातो. याउलट, तळलेले पदार्थ, मिठाई आणि मांस, मटण खाण्यावर मर्यादा आणली जाते.

दशकभरापेक्षा जास्त काळ मेंदूचा मागोवा

झेजियांग युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी ‘फ्रेमिंगहॅम हार्ट स्टडी'चा भाग असलेल्या १,६४७ मध्यमवयीन आणि वृद्ध प्रौढांचा अभ्यास केला. सुमारे १२ वर्षांच्या फॉलो-अप दरम्यान, सहभागींच्या आहाराची माहिती गोळा केली गेली आणि त्यांच्या मेंदूचे नियमित एमआरआय स्कॅन्स करण्यात आले.

स्कॅनिंगमधून काय समोर आले?

जे लोक माईंड आहार पद्धतीचे काटेकोरपणे पालन करत होते, त्यांच्या मेंदूतील ‘ग्रे मॅटर’ (मेमरी आणि विचार प्रक्रियेसाठी जबाबदार असलेला भाग) आकुंचन पावण्याचा वेग कमी होता. या आहाराचे पालन करण्याच्या स्कोअरमध्ये प्रत्येक ३ अंकांची वाढ झाल्यास, ग्रे मॅटरचे दरवर्षी होणारे नुकसान २० टक्क्यांनी कमी झाले. हे मेंदूचे वय २.५ वर्षे उशिराने वाढण्यासारखे आहे.

काही अनपेक्षित निष्कर्ष आणि मर्यादा

सहसा आरोग्यासाठी चांगले मानले जाणारे होल ग्रेन्स (अख्‍खे धान्य) या अभ्यासात मेंदूच्या आरोग्यासाठी तितकेसे प्रभावी दिसले नाहीत. तथापि, संशोधकांनी स्पष्ट केले की, दशकांपूर्वी ‘धान्य’ची व्याख्या वेगळी असू शकत असल्याने लोकांनी याला हानिकारक मानू नये. जास्त मिठाई आणि तळलेले फास्ट फूड खाणाऱ्या लोकांमध्ये मेंदू वृद्ध होण्याचा वेग जास्त आढळला. हा एक ‘निरीक्षणात्मक अभ्यास’ असल्याने, हा आहारच मेंदूचे वय कमी करतो की, निरोगी मेंदू असलेले लोक चांगला आहार घेतात, यावर तज्ज्ञांनी अधिक संशोधनाची गरज व्यक्त केली आहे. हा अभ्यास मेंदू नेहमीच तीक्ष्ण राहील अशी कोणतीही हमी देत नसला, तरी आपल्या ताटात काय आहे याचा थेट संबंध आपल्या मेंदूच्या दीर्घकालीन आरोग्याशी असतो, याला हा संशोधन भक्कम आधार देतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT