

वॉशिंग्टन : माणसाचे नशीब कधी आणि कसे बदलेल हे सांगता येत नाही. अमेरिकेतील मिशिगन राज्यात घडलेल्या एका अद्भुत घटनेने या म्हणीची पुन्हा एकदा प्रचिती आणून दिली आहे. एका व्यक्तीने भंगारवाल्याकडून ३० डॉलर्सला (सुमारे २,८०० रुपये) खरेदी केलेली एक छोटीशी पेंटिंग लिलावात चक्क १३ कोटी रुपयांना विकली गेली आहे. या कलाकृतीने त्या सामान्य व्यक्तीला रातोरात करोडपती बनवले आहे.
७० वर्षांपासून गायब होती ती प्रसिद्ध पेंटिंग
अमेरिकेतील मिशिगन येथे राहणारी एक व्यक्ती एका एस्टेट सेलमध्ये जुने विनाईल रेकॉर्ड शोधण्यासाठी गेली होती. तिथे कॉरिडोरात भंगारात पडलेली एक लहान पेंटिंग त्याच्या नजरेस पडली. त्याने ती उलट करून पाहिल्यावर मागे एका कलाकाराचे नाव दिसले, ज्याची त्याला माहिती होती. त्यामुळे त्याने अवघ्या ३० डॉलर्समध्ये ती पेंटिंग खरेदी केली. ही पेंटिंग शिकागोच्या प्रसिद्ध आर्टिस्ट गर्ट्रूड एबरक्रॉम्बी यांची असून, त्याचे नाव ‘एल्डरमैन मेरियम्स शेल’ असे आहे. विशेष म्हणजे, ही पेंटिंग गेल्या ७० वर्षांपासून लोकांच्या नजरेतून पूर्णपणे गायब होती. गर्ट्रूड यांनी ही पेंटिंग १९५१ मध्ये बनवली होती. त्यानंतर १९५२ मध्ये शिकागोच्या एका डॉक्टरला ती विकण्यात आली होती. १९५३ मध्ये शेवटचे प्रदर्शन भरल्यानंतर ती कुठेच दिसत नव्हती.
लिलावात मोडले सर्व जुने विक्रम
लिलावापूर्वी शिकागोमधील एका कंपनीकडून या पेंटिंगचे रेस्टोरेशन (संवर्धन) करण्यात आले. या पेंटिंगची सुरुवातीची किंमत केवळ १५ हजार ते २.५ लाख डॉलर्स दरम्यान वर्तवण्यात आली होती. मात्र, जेव्हा प्रत्यक्ष लिलाव सुरू झाला, तेव्हा बोलीने सर्व विक्रम मोडून काढले. अखेर ही पेंटिंग तब्बल १३ कोटी रुपयांना विकली गेली. मोठ्या रकमेवर विकली गेलेली ही गर्ट्रूड एबरक्रॉम्बी यांच्या इतिहासातील पहिलीच पेंटिंग ठरली आहे. या पेंटिंगमध्ये शिकागोचे एल्डरमन रॉबर्ट मेरियम यांनी गोळा केलेले सीशेल्स (शंख-शिंपले) दाखवण्यात आले आहेत.